काळेंना आलेल्या धमकीचा तपास सुरु

By Admin | Updated: August 14, 2014 01:48 IST2014-08-14T01:20:46+5:302014-08-14T01:48:29+5:30

अहमदनगर : आमदार अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप आणि सचिन जगताप यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले

The investigation of the threat received by Caley has started | काळेंना आलेल्या धमकीचा तपास सुरु

काळेंना आलेल्या धमकीचा तपास सुरु

अहमदनगर : आमदार अरुण जगताप, महापौर संग्राम जगताप आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे.
काळे यांच्या विधानसभा उमेदवारीच्या स्पर्धेमुळे राग आल्याने जगताप यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. १२ आॅगस्ट रोजी आपल्या कार्यालयाबाहेर दोन अज्ञात इसमांनी येऊन ‘संग्राम जगताप यांच्या विरोधात पक्षात उमेदवारी मागशील तर तुला कायमचे संपवून टाकू’ अशी धमकी दिल्याचे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही जगताप यांच्या उपस्थितीत आपल्याला धमकावल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निवेदनात काळे यांनी जगताप कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काळे यांच्या धमकी प्रकरणाच्या पोस्ट आज शिवसेनेच्या गोटातून पसरविल्या जात होत्या. विरोधकांच्या इशाऱ्यावर काळे काम करतात, अशी अफवाही आज त्यांच्या विरोधकांकडून पसरविण्यात आली. या अफवांचेही काळे यांनी खंडन केले आहे. जगताप यांच्यावर आरोप करण्यासाठी आपण विरोधकांशी अर्थपूर्ण हातमिळवणी केल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असे आरोप आधी सिद्ध करावेत. अन्यथा आपण अब्रूनुकसानीचा दावा दाखल करु, असेही ते म्हणाले.
(प्रतिनिधी)
झालेला प्रकार युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातल्याचे काळे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही बाब पक्षांतर्गत असून ती जाहीरपणे मांडण्याआधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर त्याची चौकशी केली जाईल. मात्र पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी कोणतेही आरोप, वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर किरण काळे यांनी त्यांना झालेला प्रकार खरेच सांगितला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: The investigation of the threat received by Caley has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.