जवखेडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवावा
By Admin | Updated: November 15, 2014 23:38 IST2014-11-15T23:30:34+5:302014-11-15T23:38:59+5:30
अहमदनगर : जवखेडे येथील हत्याकांड माणूस नव्हे तर सैतानच करू शकतो. हत्याकांडाचा तपास करण्यास पोलीस यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे.

जवखेडे हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवावा
अहमदनगर : जवखेडे येथील हत्याकांड माणूस नव्हे तर सैतानच करू शकतो. हत्याकांडाचा तपास करण्यास पोलीस यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा, अशी मागणी ‘एमआयएम’चे नेते व खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
ओवेसी यांनी शनिवारी सकाळी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे भेट देऊन जाधव कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर नगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जवखेडे हत्याकांड अत्यंत क्रुर पद्धतीने करण्यात आले आहे. दलित कुटुंबियांची अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. २१ दिवस झाले तरी पोलिसांना अद्याप आरोपी सापडले नाहीत, हे दुर्दैव आहे. मागास समाजातील दलित, मुस्लीम समाजातील लोकांच्या हत्या झाल्या की पोलिसांना आरोपी सापडत नाहीत, हे असे का होते? आरोपी कोण आहेत, हे पोलिसांना चांगले माहिती आहे. मात्र ते त्यांना अटक करीत नाहीत. यासाठी पोलिसांवर विसंबून न राहता तपास सीबीआयकडे सोपविण्याची गरज आहे. दलितांनाही आत्मसन्मानाने जगता आले पाहिजे. आरोपींचा तपास लागला नाही तर पोलीस यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडेल.
सीबीआयमार्फत तपास करण्याची सरकारने घोषणा केली नाही, तर वेळ पडल्यास एम.आय.एम. रस्त्यावर उतरेल. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्येही तपासाची मागणी करणार आहे. हत्याकांडाबाबत राजकारण करण्यापेक्षा माणुसकीच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री गंगाधर गाडे, औरंगाबादचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती होती. सकाळी आठ वाजताच त्यांनी मयत जाधव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
(प्रतिनिधी)