दंगलीची पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी
By Admin | Updated: May 12, 2016 23:57 IST2016-05-12T23:55:48+5:302016-05-12T23:57:41+5:30
श्रीरामपूर : क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या श्रीरामपूर दंगलीची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल.

दंगलीची पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी
श्रीरामपूर : क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या श्रीरामपूर दंगलीची नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच या घटनेशी ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा निरपराध नागरिकांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात येणार आहेत, असे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.
गुरूवारी दुपारी शिंदे यांनी श्रीरामपूरच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून दंगलीची झळ बसलेल्या दुकानदारांशी चर्चा केली. त्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना या दंगलीची विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत (आय. जी.) चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दंगलप्रकरणी सुमारे ५०० ते ७०० जणांवर गुन्हे दाखल आहेत. यात निरपराध नागरिकांची नावे गोवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.
चौकशीअंती निरपराधित्व सिद्ध झाल्यास त्यांची नावे गुन्ह्यातून वगळली जातील. हेरंब औटी यांनी नुकसान भरपाई देऊन उपयोग नाही, तर शहरातील आया बहिणींचे कुंकू सुरक्षित राहिले पाहिजे, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. दंगलीतील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. याबाबत करण्यात आलेले पंचनामे व संकलित माहिती तातडीने सरकारकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी उपस्थित जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना दिले.
याप्रसंगी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. महेश क्षीरसागर यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपअधीक्षक विवेक पाटील, निरीक्षक राजेंद्र पडवळ आदी हजर होते.
(प्रतिनिधी)
मदतीवरून मतभेद
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी नुकसान झालेल्या विशिष्ट समाजाच्या दुकानदारांच्या भेटी घेताना दुसऱ्या समाजाच्या दुकानदारांच्या भेटी घेणे टाळल्याचा तसेच आमदारांनी फळ विक्रेत्यांचीच बाजू घेतली, असा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल भनगडे यांनी मंत्र्यांसमोर केला. आ. कांबळे यांनी नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्री निधीतून भरीव मदतीचे पॅकेज देण्याची मागणी मंत्र्यांकडे केली. गुंडांना सोबत घेऊन राजकारणी फिरतात म्हणून त्यांचे मनोधैर्य वाढले असून त्यांचा बंदोबस्त करा, असे हेरंब औटी यांना म्हणाले. सुनील मुथा, गागरे, दीपाली चित्ते, मनोज छाजेड, लव शिंदे यांनीही म्हणणे मांडले.
श्रीरामपूरची दंगल पूर्वनियोजित-राम शिंदे
अहमदनगर : श्रीरामपूर येथील दंगलीत पेट्रोलचे गोळे फेकून वाहने पेटविण्यात आली होती. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजत असण्याचा संशय आहे. या दंगलीला काही जुन्या वादाची झालर असण्याची शक्यता आहे. चौकशीमध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असे गृहराज्यमंत्री व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगर येथे पत्रकारांना सांगितले. श्रीरामपूर येथे जाण्यापूर्वी राम शिंदे यांनी नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात श्रीरामपूर येथील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, उपअधीक्षक बजरंग बनसोडे, आनंद भोईटे, तहसीलदार सुधीर पाटील, गुन्हे शाखेचे शशिराज पाटोळे उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, पोलिसांचा वचक होता म्हणूनच अर्ध्या तासाच्या आत दंगल नियंत्रणात आली. सर्व जिल्ह्यातून पोलीस बळ श्रीरामपुरात दाखल झाले. दोन्ही गट आक्रमक असताना मध्यभागी पोलिसांनी दगड झेलून दंगेखोरांचा सामना केला. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे पाहिले जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे.
श्रीरामपूरवर पोलीस व महसूल प्रशासनाचे पूर्ण लक्ष व नियंत्रण आहे. एस. आय. डी. (राज्य गुप्तचर यंत्रणा), दंगल नियंत्रण पथकाची श्रीरामपूरसाठी विशेष स्थापना करण्यात येईल. प्रभाग २ मधील संवेदनशील वातावरण पाहता या भागात पोलिसांचा फिक्स पॉर्इंट, स्ट्रायकिंग फोर्सची गाडी ठेवण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाचा प्लाटून आणखी आठ दिवस ठेवण्यात येणार आहे. त्याची गरज भासल्यास आणखी काही दिवस तो त्या भागात ठेवण्यात येईल.
-प्रा. राम शिंदे,
गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री