बदलीसाठी आंतरजिल्हा शिक्षकांचे उपोषण
By Admin | Updated: May 30, 2016 23:53 IST2016-05-30T23:42:27+5:302016-05-30T23:53:43+5:30
अहमदनगर : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी राज्य शिक्षक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे.

बदलीसाठी आंतरजिल्हा शिक्षकांचे उपोषण
अहमदनगर : आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, यासाठी राज्य शिक्षक सेवा संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांनी सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांमध्ये बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवरून मतभेद झाले असून दुसरीकडे या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षक संघटना आणि पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली.
आंतरजिल्हा बदलीने बदलून येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचा आकडा २ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. यातील २०७ शिक्षकांना यापूर्वी शिक्षण विभागाने अटी-शर्तींवर जिल्ह्यात सामावून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. मात्र, साधारण सहा महिन्यानंतही या शिक्षकांना जिल्ह्यात घेतलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या या २०७ शिक्षकांनी कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. सोमवारी शिक्षण विभागाने आंदोलनकर्त्यांना पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आंतरजिल्हा शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेण्यात येईल, असे पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतर शिक्षकांचे उपोषण सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, दुपारनंतर आंदोलनकर्त्या शिक्षकांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली. २०७ ना हरकत मिळालेल्या शिक्षकांना आधी त्यांची बदली व्हावी, असे वाटत आहे. तर उर्वरित शिक्षकांना पदोन्नती झाल्यावर रिक्त होणाऱ्या २०० ते २५० जागा आणि आधीच्या २०७ जागा अशा ४५० जागांवर एकदम शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, असे वाटत आहे.
यातून आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने बिनवडे यांना उपोषण मागे घेत असल्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात उपोषण सुरूच राहिले. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना गुरुमाउली मंडळ, सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ, ऐक्य मंडळ, पुरोगामी मंडळ, इब्टा मंडळ, पदवीधर शिक्षक महामंडळ यांनी पाठिंबा दिला. तसेच जि. प. सदस्य संभाजी दहातोंडे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे, नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी पाठिंबा दिला आहे.
(प्रतिनिधी)