जेऊर येथे गतिरोधक बसवा, अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:29+5:302021-02-05T06:41:29+5:30
केडगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात वाहने वेगात असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असून येथे गतिरोधक बसविण्याची अनेक दिवसांची मागणी ...

जेऊर येथे गतिरोधक बसवा, अन्यथा उपोषण
केडगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात वाहने वेगात असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असून येथे गतिरोधक बसविण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून तत्काळ गतिरोधक न बसविल्यास ६ फेब्रुवारीला ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे व ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटोळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
येथील महावितरण कंपनीच्या चौकात तसेच बसस्थानक परिसरात गतिरोधक बसविण्याबाबत राजेंद्र दारकुंडे व पाटोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. महावितरण कंपनीच्या चौकात व बसस्थानक परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. या परिसरात आजपर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले आहे. येथील अपघाताची मालिका सुरूच असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची गरज आहे. यापूर्वी संबंधितांशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथे गतिरोधक न बसविल्यास बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ६ फेब्रुवारीला ग्रामस्थांसह उपोषणाला बसण्याचा इशारा राजेंद्र दारकुंडे व मधुकर पाटोळे यांनी दिला आहे.
-----
गतिरोधकासाठी ग्रामसभेचा ठराव..
महावितरण कंपनीचा चौक व बसस्थानक परिसरात वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्याबाबत जेऊर ग्रामसभेत ठरावही झालेला आहे. ठरावाच्या प्रती संबंधित विभागाला पाठवूनही त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.