नेवासा : राज्यात सर्वाधिक कांदा आवक घोडेगाव येथे होते आहे. ही बाब नेवाशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. बेरोजगार, तरुण शेतकरी कांदा व्यापारी, आडतदार करणारा येथील उपक्रम कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी, दिशादर्शक आहे. यातून प्रेरणा घेऊन राज्यपातळीवर काम करू, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडगाव येथील नवीन विस्तारित २९ कांदा गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे व संचालकानी कृषिमंत्र्यांचा सन्मान केला.
यावेळी भुसे म्हणाले, मंत्री शंकरराव गडाख हे नेहमी नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी व विविध शेतीपूरक योजना राबविण्यासाठी भेटत असतात. घोडेगावसारख्या ठिकाणी गडाख यांनी प्रयत्नपूर्वक सुरू केलेले कांदा मार्केट योग्य व्यवस्थापनामुळे देशभरात प्रसिद्ध झाले आहे, असेही गौरवोद्गार भुसे यांनी काढले. सचिव देवदत्त पालवे यांनी आभार मानले.
-----
विविध प्रश्नांवर गडाखांचा पाठपुरावा..
जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी पाणी, पीकविमा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली. याची मला माहिती असून, आताही मंत्री झाल्यावर मुंबईतील अनेक बैठकीत शेतकरी प्रश्नांवर त्यांचा पाठपुरावा असतो. बियाणे, खते, नुकसानभरपाई, पीकविमा यासाठी शंकरराव यांची आग्रही भूमिका असते, असे भुसे यांनी सांगितले.
---
मंत्र्यांनी केला कांदा लिलाव..
घोडेगाव बाजार समितीच्या कार्यक्रमप्रसंगी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी कांद्याचा लिलाव केला. लिलाव केलेल्या कांद्याला सर्वोच्च २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.
------
२८ नेवासा भुसे
घोडगाव येथील बाजार समितीच्या कांदा व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन करताना कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व इतर.