अमरापूर प्रकल्पाची केंद्रीय समितीकडून पाहणी
By Admin | Updated: May 24, 2016 23:38 IST2016-05-24T23:36:31+5:302016-05-24T23:38:06+5:30
शेवगाव:अमरापूर येथील सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला केंद्र शासनाचे जलव्यवस्थापन सल्लागार आणि निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे संस्थापक श्रीकांत नावरेकर यांनी भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली़

अमरापूर प्रकल्पाची केंद्रीय समितीकडून पाहणी
शेवगाव: राज्याला पथदर्शी ठरलेल्या अमरापूर येथील सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला केंद्र शासनाचे जलव्यवस्थापन सल्लागार आणि निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे संस्थापक श्रीकांत नावरेकर यांनी भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली़ हा प्रकल्प अत्यंत कमी खर्चात सांडपाण्याचा पुनर्वापर कसा करावा यासाठी देशाला पथदर्शक ठरेल असा असून ग्रामस्थांचे संघटन आणि सहकार्य कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली
या सांडपाणी व्यवस्थापनामुळे गाव डासमुक्त झाले आहेच शिवाय गावच्या नदीतील पाण्याचे प्रदूषण या प्रकल्पामुळे रोखले गेले आहे. ही बाब अतिशय महत्वाची असून गावोगाव असे प्रकल्प उभे राहिल्यास गंगा शुद्धीकरणासारख्या योजनांवरील शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचेल व गावचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यामुळे ही चळवळ गावोगाव उभारण्यासाठी शासकीय पातळीवर शिफारस करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितल़े़ नावरेकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील स्वच्छता विभागाचे अधिकारी मयूर मोहिते उपस्थित होते.
सरपंच विजय पोटफोडे यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली़ यावेळी बाळासाहेब चौधरी, ग्रामसेवक अण्णासाहेब नजन , सदस्य बाळासाहेब सुसे , काकासाहेब म्हस्के, अरुण बोरुडे, प्रदीप बोरुडे, रमेश खैरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ (शहर प्रतिनिधी)