अंतरंगातून काव्यनिर्मिती
By Admin | Updated: September 1, 2014 00:00 IST2014-08-31T23:42:26+5:302014-09-01T00:00:08+5:30
अहमदनगर : समाजवास्तवाचे चिंतन केल्यानंतर अंतरंगातूनच काव्यनिर्मिती होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले़

अंतरंगातून काव्यनिर्मिती
अहमदनगर : लेखकाला स्वत:सह दुसऱ्याचीही लढाई लढावी लागते़ संघर्ष पहावा आणि अनुभवावा लागतो़ समाजवास्तवाचे चिंतन केल्यानंतर अंतरंगातूनच काव्यनिर्मिती होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले़
नगर येथे आयोजित कवयित्री संजीवनी खोजे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भोंजाळ, अरविंद्र ब्राम्हणे, चंद्रकांत पालवे आदी उपस्थित होते़ यावर्षीचा कवयित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार औरंगाबाद येथील कवी अभय दाणी यांच्या ‘ऐरवी हा जाळ’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला़ सासणे पुढे म्हणाले की, मनाच्या गूढ अंतरंगात कवितेचा जन्म होतो़ शब्दांच्या शोधात कधीच कविता होत नाही़ आशयानंतर शब्द येतात़ कवितेची अनेक रुपे असतात़ कविंनी पद्यासह गद्यातही कविता लिहावी असे ते म्हणाले़ कवी अभय दाणी म्हणाले की, दिवसेंदिवस साहित्यात मोठी दरी निर्माण होत आहे़ वाङमयीन संस्थांनी ही दरी भरून काढावी़ जगण्यातील संघर्ष अनुभवत असताना कवितेची निर्मिती होते़ कविता समजून घ्यावयाची असेल तर जीवनाचा वेग कमी करून समाज समजून घ्यावा लागतो असे ते म्हणाले़ यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भोंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले़ दरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोहिणी उदास यांना देण्यात आले़ बानू शेख यांना द्वितीय तर अनिल देशपांडे, गणेश कवटे व नागेश शेलार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले़ केशव भणगे यांनी प्रास्ताविक केले़ कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत मुथा, दिनेश रोडे, साहित्यिक संजय कळमकर, अमोल बागूल, चं़वि़ जोशी,भास्करराव डिक्कर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़ अरविंद ब्राह्मणे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)