कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:24+5:302021-08-14T04:26:24+5:30
जिल्हा परिषद भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...

कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार
जिल्हा परिषद भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, समितीचे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी या विधवा महिलांचे सर्वेक्षण होण्याची गरज असून, तालुका स्तरावर या महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असलेल्या समितीची गरज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, बालसंगोपन योजना यशस्वी होण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी यांच्या मदतीने लाभार्थ्यांचे अर्ज भरून १,१०० रुपयांचा लाभ देणे, अंगणवाडी भरती व जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये या विधवा महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, पंधराव्या वित्त आयोगात महिलांसाठी खर्च करायची जी रक्कम आहे, त्या रकमेचा खर्च या महिलांवर करण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनेचे कॅम्प बाजाराच्या गावी लावण्यात यावेत, अशा विविध मागण्या केल्या.
खाते प्रमुखांशी चर्चा करून, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या टास्क फोर्सने आदेशित केल्यास, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत या महिलांचे सर्वेक्षण करण्यात येईल व तालुका स्तरावर या कामासाठी समितीचाही विचार करण्यात येईल, असे सांगितले. संजय गांधी निराधार योजनेबाबत बाजाराच्या गावी कॅम्प लावायला अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविली.
जालिंदर वाकचौरे यांनी बैठकीत अंगणवाडी भरतीत कोरोना विधवा महिलांना प्राधान्य देण्याची विनंती शासनाकडे करावी व या महिलांना सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासाठी येणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडणार असून, जिल्हा परिषद या महिलांसाठी प्रायोगिक स्वरूपाचे पथदर्शक काम करेल. हा पॅटर्न महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीसाठी कोरोना पुनर्वसन समितीचे सदस्य अशोक कुटे (नेवासा), संगीता मालकर(कोपरगाव), कारभारी गरड (नेवासा), अमोल घोलप (शेवगाव), किसन आव्हाड (पाथर्डी), नितेश बनसोडे (नगर) आदी उपस्थित होते.
समितीच्या सदस्यांनी नंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन हाच प्रश्न मांडला. या मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन रोजगार निर्मितीबाबत चर्चा केली व आगामी टास्क फोर्सच्या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर विचार करण्याचे सूचित केले.
-----------
फोटो : १३झेडपी मिटिंग
कोरोनात विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, गटनेते जालिंदर वाकचौरे, हेरंब कुलकर्णी आदी उपस्थित होते.