उद्योजकांना १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी
By Admin | Updated: November 29, 2014 00:00 IST2014-11-28T23:55:42+5:302014-11-29T00:00:53+5:30
अहमदनगर : उद्योजकांच्या पाणीपट्टीचे दर वाढविणारा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत़

उद्योजकांना १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी
अहमदनगर : उद्योजकांच्या पाणीपट्टीचे दर वाढविणारा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पूर्वीप्रमाणे म्हणजे १८ रुपयांत एक हजार लीटर पाणी मिळणार आहे़ मुळा धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचा याचा लाभ मिळणार आहे़
उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते़ जिल्ह्यातील तीन औद्योगिक वसाहतींना मुळा धरणातून पाणीपुरवठा होतो़ पाणीपुरवठ्याचा खर्च मोठा आहे़ उद्योगांसाठी दररोज मोजून पाणी दिले जाते़ येथील नळांना मीटर बसविलेले आले आहेत़ त्यातून उद्योजक दररोज हजारो लीटर पाणी विकत घेतात़ पूर्वी प्रति हजार लीटरला १८ रुपये, असे दर निश्चित करण्यात आले होते़ मात्र या दरात डिसेंबर २०१३ मध्ये ७ रुपयांनी वाढ करण्यात आली़ त्यामुळे १८ रुपयांवरून पाण्याचे दर २५ रुपये झाले़
परिणामी उद्योजकांना येणाऱ्या पाणीपट्टीत भरमसाठ वाढ झाली़ पाणीपट्टी कमी करण्यासाठी उद्योजकांच्या विविध संघटनांकडून प्रयत्न करण्यात आले़ उद्योजकांच्या मागणीची दखल घेऊन येथील प्रादेशिक कार्यालयाने याविषयीचा प्रस्ताव राज्य औद्योगिक विकास महामंडळास सादर केला़ मात्र गेल्या एक वर्षांत यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही़ औद्योगिक वसाहतींसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या विजेचा दर कमी करण्याची मेहरबानी झाली़ पाणी योजनांसाठी प्रति युनिट ५ रुपये ५ पैसे दर, असे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत़ विजेच्या बिलात कपात झाल्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा खर्च वाचला आहे़
पाण्याचा खर्च कमी झाल्याने उद्योजकांच्या पाणीपट्टीत कपात करण्यात आली आहे़ पाण्याचे हे नवीन दर चालू महिन्यापासूनच लागू केल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे़
नागापूर औद्योगिक वसाहतीसह सुपा- पारनेर आणि नेवासा येथील वसाहतींना मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ मुळा धरण येथून औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली असून, विद्युत मोटारीव्दारे पाणीउपसा केला जातो़
पाणीपुरवठा विभागाला दरमहा १ कोटी २५ लाख रुपये वीज बिल येत होते़ मात्र नवीन निर्णयानुसार ते ७५ लाख इतके येईल़पाणीपुरवठा विभागाचा खर्च कमी झाल्याने उद्योजकांना कमी दरात पाणी देणे शक्य झाले असून, या महिन्यातील पाणीपट्टी नवीन दरानुसार तयार करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले़
(प्रतिनिधी)