इंडियन सिमलेसचा तिढा कायम
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:22:49+5:302014-06-14T01:19:29+5:30
अहमदनगर: येथील इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगारांतील वादावर शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही़ कंपनी कामगारांच्या कारवाईवर ठाम

इंडियन सिमलेसचा तिढा कायम
अहमदनगर: येथील इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगारांतील वादावर शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही़ कंपनी कामगारांच्या कारवाईवर ठाम असून, संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे़ त्यामुळे पुन्हा शनिवारी बैठक होणार असल्याचे कामगार कार्यालयाकडून सांगण्यात आले़ त्यामुळे कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे़
इंडियन सिमेलस कंपनीच्या आवारात कामाच्यावेळेत कामगारांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेने बैठक घेतली़ बैठकीस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते़ त्यामुळे व्यवस्थापनाने दुसऱ्या दिवशी बुधवारी विद्युत पुरवठा बंद करून उत्पादन बंद केले़ तशी सूचना त्यांनी प्रवेशव्दारावर लावली़ परंतु तरीदेखील कामगारांनी काम करण्याची तयारी दर्शविली होती़ मात्र कंपनीने उत्पादनास सुरुवात न करता कामगारांना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढले़ त्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला़ संघटनेने कंपनीच्याविरोधात कामगार आयुक्तांकडे धाव घेतली़ तर कंपनीनेही उत्पादन बंद करत असल्याचे कामगार कार्यालयास कळविले असून कंपनीत दमदाटी केल्याने १२ कामगारांना निलंबित केले आहे़ त्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे़ याविषयी झालेल्या तीनही बैठकीत तोडगा निघाला नाही. या बैठकीस कंपनी व्यवस्थापनाचे पुणे येथील भामरे उपस्थित होते़ त्यांनी १२ कामगारांवरील कारवाई मागे घेऊन उत्पादन सुरू करण्यात येईल़ मात्र निलंबित कामगारांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी अट संघटनेला घातली़ परंतु कामगारांची चौकशी न करता त्यांना कामावर हजर करून घ्या आणि उत्पादन सुरू करा,अशी मागणी यावेळी संघटनेने केली़ (प्रतिनिधी)
कंपनीचे प्रतिनिधी नॉटरिचेबल
इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते़ कंपनीची बाजू त्यांनी कामगार आयुक्तांसमोर मांडली़ परंतु तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली़ याविषयी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे याविषयी कंपनीने काय भूमिका घेतली, ते समजू शकले नाही़
दिवसभरात संघटना व कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत दोन बैठका झाल्या़ दोन्ही बैठकांत तोडगा निघाला नाही़ कामगारांवरील कारवाईविषयीच चर्चा झाली़ उत्पादन सुरू करून इतर कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले़ मात्र कंपनीने त्यास विरोध दर्शविला असून, संघटनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे़ उद्या शनिवारी याविषयी बैठक होणार असून, या बैठकीतून तोडगा निघेल,अशी अपेक्षा आहे़
- बाळासाहेब वाघ, सहाय्यक आयुक्त, कामगार कार्यालय