वाढता वाढता वाढे..... दुष्काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:27 IST2019-03-05T11:26:03+5:302019-03-05T11:27:35+5:30

दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागताच हातात खोरं, डोक्यावर घमेलं घेऊन रोजगार हमी गाठणाऱ्यांच्या संख्येतही तीव्रतेने वाढ होत आहे़

Increasingly Increase ..... Drought! | वाढता वाढता वाढे..... दुष्काळ!

वाढता वाढता वाढे..... दुष्काळ!

अहमदनगर : दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागताच हातात खोरं, डोक्यावर घमेलं घेऊन रोजगार हमी गाठणाऱ्यांच्या संख्येतही तीव्रतेने वाढ होत आहे़ नगर जिल्ह्यात सद्यस्थितीत १५ हजार लोक रोजगार हमीवर राबत आहेत़
एरव्ही फेब्रुवारी-मार्च महिन्यात खरिप हंगामात शेतकरी गुंतलेला असतो़ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या नगण्य असते़ मात्र, दुष्काळामुळे यंदा शेतीत काही काम उरले नाही़ ग्रामीण रोजगाराची इतर कामेही नाहीत़ त्यामुळे रोजगार हमीवर कामांवर मजुरांची संख्या वेगाने वाढत आहे़ जिल्ह्यात १ हजार ५७८ कामांवर १५ हजार ११८ मजूर राबत आहेत़ गाळ काढणे, पाझर तलाव दुरुस्ती, रस्ते, विहीर पुनर्भरण यासह वैयक्तिक विहीर, घरकूल, शौचालय, जनावरांचा गोेठा अशी कामे रोजगार हमी अंतर्गत सुरु आहेत़ ग्रामपंचायत पातळीवर काम मागणी अर्जांमध्ये मोठी वाढ होत आहे़ त्यामुळे लवकरच रोजगार हमीवरील संख्या काही लाखाच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़

रस्त्यांच्या कामांवर ६ हजार मजूर
जामखेड, कर्जत, नगर, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये मग्रारोहयो योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत़ या कामांवर सर्वाधिक ६ हजार २३३ मजूर काम करीत आहेत़ त्यापैकी ३ हजार १५० म्हणजे सुमारे ५० टक्के मजूर पारनेर तालुक्यातील आहेत़

छावण्यांची संख्या ६७
जिल्ह्यात चारा छावण्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. शनिवारी आणखी २१ छावण्यांना मंजुरी देण्यात आली, त्यामुळे एकूण छावण्यांची संख्या ६७ झाली आहे. अजूनही जिल्ह्यातून छावण्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
दुष्काळी स्थितीमुळे राज्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असल्याने शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरात जिल्ह्यातून प्रस्ताव मागवले गेले. हे प्रस्ताव तहसीलमधून प्रांत कार्यालयात व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम मंजुरीसाठी येत आहेत. ३०० पेक्षा जास्त जनावरे असलेल्या गावात छावण्या मंजूर होत आहेत. आतापर्यंत ४६ छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात सर्वाधिक २७ छावण्या पाथर्डी तालुक्यात, पारनेर व जामखेड तालुक्यात प्रत्येकी ६, नगर व कर्जतमध्ये प्रत्येकी ३, तर श्रीगोंदा तालुक्यात १ छावणी मंजूर होती. आता त्यात वाढ होत नगर तालुक्यात सहा, श्रीगोंद्यात चार, कर्जतमध्ये १३ छावण्या झाल्या आहेत. शेवगावमध्ये पहिल्यांदाच पाच छावण्यांना मंजुरी मिळाली आहे.
मंजूर छावण्यांपैकी बहुतांश छावण्या अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. जनावरे कमी असल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे. परंतु मंजूर झालेली छावणी सुरू होण्याबाबत जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा दोन गटांतील राजकारणातून जनावरे उपाशी राहणार आहेत.
नव्याने मंजूर झालेल्या छावण्या
नगर : राळेगण म्हसोबा, सारोळा बद्दी, हातवळण.
श्रीगोंदा : तरडगव्हाण, चोंबुर्डी, वडघूल.
कर्जत : मिरजगाव, रवळगाव, घुमरी, चांदे बुद्रूक, नागपूर, मुळेवाडी, निमगाव गांगर्डा, कोकणगाव, बाभूळगाव खालसा व तिखी.
शेवगाव : नजीक बाभूळगाव, आधोडी, वरखेड, जोहरापूर व ठाकूर निमगाव.
अकोलेत घरकुलाची कामे जास्त
मग्रारोहयो योजनेअंतर्गत जिल्ह्यात घरकुलाची ७८० कामे सुरु असून, या कामांवर २ हजार ६९५ मजूर आहेत़ त्यापैकी अकोले तालुक्यात सर्वाधिक २१७ कामांवर ६२० मजूर काम करीत आहेत़

Web Title: Increasingly Increase ..... Drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.