कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी १ जूनला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. कोरोनाग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी येथील स्वतंत्र इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नॉन-कोविड रुग्णांवर रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या ‘नॉन-कोविड’ रुग्णांचा व कोरोना रुग्णांचा संपर्क येत नाही. कोरोनाची टेस्ट करायला येणाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागांतर्गत तालुक्यातील आश्वी, बोटा, घारगाव, निमगाव जाळी, धांदरफळ खुर्द, जवळे कडलग, निमोण, तळेगाव दिघे, जवळे बाळेश्वर, चंदनापुरी या दहा गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. येथे नॉन-काेविड रुग्णांवर नेहमीप्रमाणेच सेवा देण्यात येते. तसेच बालरोग उपचार विभाग, प्रसूती, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर महिलांना उपचार, बालकांचे लसीकरण आणि रक्ताच्या विविध तपासण्या होतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कोरोनाची टेस्ट करत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांव्यक्तिरिक्त येथे उपचारांसाठी येणाऱ्याची संख्या अधिक असल्याने येथेही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सांगितले.
--------------
कोरोना रुग्णांवर उपचार
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात विशेष कोविड आरोग्य केंद्र, संगमनेर नगर परिषदेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केअर सेंटर आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेल्या शहर व ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये कोविड हेल्थ केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
-------------
सरकारी रुग्णालयांमध्ये ‘नॉन-कोविड’ रुग्णांना नेहमीप्रमाणेच उपचार मिळावेत याकरिता ‘नॉन-कोविड’ आणि कोविड असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतदेखील नॉन-कोविड रुग्णांची कुठलीही गैरसोय होत नाही. तसे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
- डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, संगमनेर उपविभाग
---------------------
शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांकरिता रुग्णवाहिकांचेदेखील ‘नॉन-कोविड’ आणि कोविड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांमुळे इतर रुग्णांना कोरोनाची बाधा होऊ नये. याची विशेष काळजी घेण्यात येते आहे.
- डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, संगमनेर
--------------
खासगी रुग्णालयांमध्येही स्वतंत्र व्यवस्था
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार घेणाऱ्याची संख्या मोठी आहे. शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये ‘नॉन-कोविड’ रुग्णांवर उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी कोविड वॉर्ड, कोविड विभाग सुरू केल्याचे काही खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले.