घटना आठवली की कापरं भरतं
By Admin | Updated: July 23, 2016 00:07 IST2016-07-22T23:58:33+5:302016-07-23T00:07:41+5:30
अकोले : अर्ध्या तासात घोटीला पोहचतो! असं फोन वरुन नातेवाईकांना सांगत होतो.. तेव्हड्यात धाड-धाड गाडी आदळायला लागली.

घटना आठवली की कापरं भरतं
अकोले : अर्ध्या तासात घोटीला पोहचतो! असं फोन वरुन नातेवाईकांना सांगत होतो.. तेव्हड्यात धाड-धाड गाडी आदळायला लागली. प्रवाशांचं डोकं गाडीच्या टपाला आदळत होतं, कुणी ओरडत होतं तर कुणी पडत होतं आपटी खात होतं, कुणाच डोकं फुटलेलं तर कुणाच्या हनवटीतून रक्त येत होतं. काय झालं समजायच्या आत गाडी खडकाला जोरात धाडकन आदळली अन् थांबली.. समोर २०० फुटावर खोल दरी.. सुदैवानं वाचलो! भयंकपित करणारी ही घटना आठवली की कापर भरतं.. असं इंदोरी येथील कैलास एकनाथ शिंदे सांगत होते.
गुरुवारी बारी घाटात मोठी दुर्घटना होताहोता टळली. अकोले-कसारा एस. टी. बसला अपघात झाला. गाडी घाटात उताराला असताना बे्रक फेल झाले. चालक मच्छिंद्र घोडके यांनी प्रसंगावधान साधून गाडी खडकाला ठोकरली. तरी गाडी खड्ड्यात आपटत दरीकडे गेली. त्यात गाडीचा स्टेअरींग रॉड तुटला, गाडीची पुढची चाके निखळून पडली अन् गाडी दरीच्या मागे २०० फुटावर थांबली. त्या पुढे ५००-७०० फूट खोल दरी होती. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गाडीत ५६ प्रवासी होते पैकी चालक वाहकासह काही प्रवासी जखमी झाले. बऱ्याच जणांना मुक्कामार लागला असून मणक्याला इजा झाली़ एका महिलेचे डोके फुटले़ एका प्रवाशाच्या हनवटीला लागले. प्रवाशांवर अकोले, घोटी, राजूर तेथे उपचार करण्यात आले. जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी बारी कळसुबाई परिसरातील स्थानिक आदिवासींसह अनेक पर्यटकांनी मदत केली. जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनीही ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार केले.
इंदोरी येथील कैलास शिंदे व त्यांच्या पत्नी हेही याच गाडीतून प्रवास करत होते.शिंदे यांचा डावा हात खांद्यापासून निखळलाय तर पत्नीला थोडी इजा झाली. ते अपघातातील तो बाका प्रसंग सांगत होते.
(प्रतिनिधी)
गाड्यांची दुरूस्ती होते का? प्रवाशांना शंका
कसारा गाडी अकोले आगारातून सुरु होण्यापूर्वी तिचा ‘गिअर बॉक्स’ खराब होता. तेव्हा वाहकाने दुसरी गाडी बदलून घेतली. बारी घाटात त्या गाडीचेही ब्रेक फेल झाले असे शिंदे सांगतात. एकंदर सर्वच गाड्यांची अशी दुरवस्था आहे. अकोले आगाराची गाडी कुठे बंद पडलेली दिसेल हे सांगता येत नाही. गाड्यांची दुरूस्ती केली जाते का? याबाबत प्रवाशांना शंका आहे .या आगारातील यांत्रिक विभागाचे कर्मचारी नेमके काय काम करतात? हा सवाल उपस्थित होत आहे.
अकोले एस.टी.आगारात ५९ बस गाड्या आहेत. बसेसची देखभाल करण्यास ५० मेकॅनिकल स्टाफ आहे. गाड्यांची दररोज तसेच दहा दिवसांनी एकदा व तीन महिन्यांनी एकदा विशेष देखभाल केली जाते. सहा महिन्यांनी जनरल तपासणी करुन गाड्यांची योग्य देखभाल केली जाते. गाडी आगारातून ताब्यात घेतानाच चालक गाडी ट्रायल घेतात. मग गाडी आगाराबाहेर पडते. रस्त्यावरचे वाहन आहे कधी काय होईल सांगता येत नाही़
-राणी वर्पे, आगार व्यवस्थापक