शस्त्रक्रियेची अपुरी सुविधा
By Admin | Updated: June 2, 2016 23:07 IST2016-06-02T22:58:52+5:302016-06-02T23:07:56+5:30
विनोद गोळे, पारनेर पारनेर शहरासह परिसरातील सामान्य लोकांना जीवनदायी ठरणाऱ्या पारनेर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची संख्या अपुरी आहे.

शस्त्रक्रियेची अपुरी सुविधा
विनोद गोळे, पारनेर
पारनेर शहरासह परिसरातील सामान्य लोकांना जीवनदायी ठरणाऱ्या पारनेर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची संख्या अपुरी आहे. सुसज्ज इमारत आहे पण छत गळके असल्याने पावसाळ्यात रूग्णालयातच पाणवठे तयार होतात. प्राथमिक तपासणीसाठी रूग्णांची संख्या चांगली आहे पण शस्त्रक्रियेची सुविधा मात्र अपुरी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत या ग्रामीण रूग्णालयाला संजीवनी देणार का, हाच खरा प्रश्न आहे़
पारनेर-सुपा मार्गावर पारनेर ग्रामीण रूग्णालयाची सुसज्ज इमारत शासनाने उभारली आहे. सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उंदरे, डॉ.भोंडवे काम पाहतात. पारनेर शहरासह गटेवाडी, पानोली, राळेगणसिध्दी, जातेगाव, घाणेगाव, वडनेर हवेली, चिंचोली, म्हसणे, बाबुर्डी, हंगा, सुपा, लोणी हवेली, डिकसळ, करंदी यासह शेजारील वाड्या-वस्त्या या रुग्णालयाशी संलग्न आहे. या सुसज्ज रूग्णालयात मोठी स्पेशल रूम, महिलांसाठी स्वतंत्र रूम, रूग्ण तपासणी केंद्र ,जनरल वॉर्ड यासह सुविधा आहेत. परंतु पावसाळ्यात मात्र छत गळत असल्याने तळ्याचे स्वरूप येते.
एक वैद्यकीय अधिकारी भूलतज्ञ म्हणून नेमणूक झाल्यास मोठ्या शस्त्रक्रिया येथे होऊ शकतात. यासाठी आॅपरेशन थिएटरमध्ये सुसज्जता आणणे गरजेचे आहे. एक्स-रे तंत्रज्ञ नसल्याने मशीन धुळखात पडून आहे. महिलांची प्रसूती येथे चांगल्या प्रकारे होते. तसेच बुधवार व शनिवार डोळ्यांची शिबिरे होऊन उपचार होतात, गरोदर माता व बालकांना डोस दिले जातात.
ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याविना रूग्णांना अन्यत्र भटकंती करावी लागते. अपघाती किंवा अन्य प्रकारात मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी कायमस्वरूपी माणूस नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची हेळसांड होेते. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत शुक्रवारी पारनेर ग्रामीण रूग्णालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीतून सामान्य लोकांसाठी उपयोगी पडणाऱ्या ग्रामीण रूग्णालयाला संजीवनी देणार का? याची उत्सुकता पारनेरकरांना आहे.