टाकळी ढोकेश्वर : मांडओहळ धरणातून टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या या गावांसाठी राबविण्यात येत असलेल्या पाणी योजनेचे सुरू असलेेले निकृष्ट काम सुधारण्याची गरज असून उर्वरित कामे ऑगस्ट अखेर पूर्ण करा, असे खडेबोल जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी सुनावले.
नळ पाणी पुरवठा योजना टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या यांच्या कामासंदर्भात दाते यांनी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, सरपंच, दोनही योजनेचे ठेकेदार यांच्या उपस्थितीत नगर येथे बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
दोन्ही पाणी पुरवठा योजनांच्या मांडओहळ येथील उद्धभव विहिरीचे (जॅक वेल) काम पूर्ण झाले आहे. कार्जुले हर्या योजनेच्या उर्ध्व वाहिनीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण झाले आहे व जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चाचणी घेतली आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे रंग काम व फिल्टर मीडिया भरण्याचे काम काम बाकी आहे. हे काम १५ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना दाते यांनी ठेकेदारास दिल्या. वाडी-वस्तीवरील पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असून वाडी-वस्तीवरील जलकुंभाच्या जागेचे बक्षीस पत्र करणे बाकी आहे. त्यामुळे जलकुंभाचे काम सुरू करता आले नाही. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्जुले हर्याचे सरपंच यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून जलकुंभ जागेबाबत लवकरात लवकर ग्रामपंचायतीमार्फत कार्यवाही करावे, असे सांगितले.
--
ग्रामपंचायतीने वीजजोडणी करावी..
मांड ओहळ येथील वीज जोडणीचे काम कार्जुले हर्या ग्रामपंचायतीने करावे. त्यामुळे योजना कार्यान्वित करण्यास अडचणी येणार नाहीत. तसेच पाणी शुद्धीकरण करण्यासाठी लागणारे साहित्य (टीसीएल व इतर केमिकल) याची उपलब्धता करण्यात यावी, असेही दाते यांनी यावेळी संबंधितांना सांगितले.