पठार भागात वाळूची अवैधरित्या वाहतूक; महसूल विभागाकडून २ ट्रॅक्टर जप्त
By शेखर पानसरे | Updated: June 23, 2024 14:51 IST2024-06-23T14:50:55+5:302024-06-23T14:51:11+5:30
रात्री अडीच-तीन वाजेच्या दरम्यान दोन ट्रॅक्टर सराटी येथील एका मंदिराजवळून घारगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जात असताना त्यांना दिसले.

पठार भागात वाळूची अवैधरित्या वाहतूक; महसूल विभागाकडून २ ट्रॅक्टर जप्त
घारगाव : नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करत वाळू वाहतूक होत असलेले दोन ट्रॅक्टर-ट्रॉली महसूल विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई रविवारी (दि.२३) पहाटे तीन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील बोरबनवाडी येथे करण्यात आली. महसूल पथकाने जप्त केलेले विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आल्याचे तलाठी दादा शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आंबी खालसा गावाच्या बाजूने मुळा नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करत ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळूची वाहतूक बोरबनवाडी गावच्या परिसरात होत असल्याची माहिती तलाठी शेख यांना मिळाली होती. त्यांनी कोतवाल शशिकांत खोंड यांना बरोबर घेतले. रात्री अडीच-तीन वाजेच्या दरम्यान दोन ट्रॅक्टर सराटी येथील एका मंदिराजवळून घारगावच्या दिशेने खोबरेवाडीकडे जात असताना त्यांना दिसले. त्यांनी चालकांना थांबविले असता वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना त्यांच्याकडे नव्हता. असेही तलाठी शेख यांनी सांगितले.