अवैधरित्या दारू विक्री, संगमनेरात पाच ठिकाणी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:47+5:302021-05-27T04:22:47+5:30
----------- कारमधून देशी दारूची वाहतूक सोमवारी (दि. २४) दुपारी साडे चारच्या सुमारास चिखली गावच्या पुढे अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ...

अवैधरित्या दारू विक्री, संगमनेरात पाच ठिकाणी छापे
-----------
कारमधून देशी दारूची वाहतूक
सोमवारी (दि. २४) दुपारी साडे चारच्या सुमारास चिखली गावच्या पुढे अकोलेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एम. एच. १४, बी. आर. ७४००) देशी दारूची वाहतूक सुरू होती. या कारमधून देशी दारूच्या २ हजार ४९६ रूपयांच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. रामदास सूर्यभान रोहम (वय ४५, रा. अरगडे मळा, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) याच्याविरोधात पोलीस नाईक राजेश एकनाथ जगधने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ लाख २० हजार रूपये किमतीची कार व २ हजार ४९६ रूपयांच्या देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ५ लाख २२ हजार ४६९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक एन. एम. खाडे तपास करीत आहे.
--------
गावठी दारू जप्त
सोमवारी (दि. २४) संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास राजापूर शिवारातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीपात्रात झाडाच्या आडोशाला गावठी दारू हातभट्टीवर कारवाई करत ३० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू, शंभर लीटर कच्चे रसायन व दारू बनविण्याचे साहित्य असा एकूण ८ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करत राजू पिपळे (रा. राजापूर, ता. संगमनेर) याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले अधिक तपास करीत आहेत.
--------
देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त
मंगळवारी (दि. २५) संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास खराडी गावात कारवाई करत अर्जुन भागाजी पवार (रा. खराडी, ता. संगमनेर) याच्याकडून देशी दारूच्या २ हजार ४९६ रूपयाच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉस्टेबल अमित महाजन अधिक तपास करीत आहेत.
------------
हॉटेलच्या पाठीमागे दारू विक्री
मंगळवारी (दि. २५) रात्री आठच्या सुमारास समनापूर येथील एका हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला कारवाई करत १ हजार ३०० रुपये किमतीच्या ५० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी शौकत आयुब शेख (रा. समनापूर, ता. संगमनेर) याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल महादेव रामचंद्र हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक एन. एम. धादवड अधिक तपास करीत आहेत.
---------
घराच्या आडोशाला दारूची विक्री
मंगळवारी (दि. २५) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राजहंस रतन शिंदे (वय ५३, रा. देवगाव, ता. संगमनेर) हा घराच्या आडोशाला विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडील ५ हजार ५०० रूपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विजय पवार अधिक तपास करीत आहेत.