शेवगाव तालुक्यातील नद्यांच्या पुनरूत्थानाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:00+5:302021-09-07T04:26:00+5:30
शेवगाव : तालुक्यातील नद्या, ओढे, नाले यांच्या पुनरूत्थानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गत आठवड्यात नदीकाठच्या काही गावांना पुराचा तडाखा बसला. ...

शेवगाव तालुक्यातील नद्यांच्या पुनरूत्थानाकडे दुर्लक्ष
शेवगाव : तालुक्यातील नद्या, ओढे, नाले यांच्या पुनरूत्थानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गत आठवड्यात नदीकाठच्या काही गावांना पुराचा तडाखा बसला. नदीपात्राला पडलेला बाभळींचा विळखा, अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे अरुंद झालेले पात्र, प्रदूषण याचा सर्वाधिक परिणाम महापुरात दिसून आला.
गत आठवड्यात नदी तिरावरील गावांना पुराचा फटका बसला. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. शेकडो जनावरे वाहून गेली. भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच नद्यांची रुंदीकरण मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे नदी तिरावरील गावकऱ्यांना पाऊस आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते आहे.
शेवगाव तालुक्यातून गोदावरी, नंदिनी, ढोरा, काशी, भागीरथी, खटकळी, चांदणी, सुकी आदीसह अन्य प्रमुख नद्या वाहत आहेत. यातील बहुतांश नद्या गर्भगिरीच्या डोंगरमाथ्यावरून प्रवाहित होऊन वाहतात. तर अनेक ठिकाणचे ओढे, नाले प्रमुख नद्यांना मिळतात. सोबतच अनेक लहान-मोठ्या नद्या व नाले आहेत. तालुक्याला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. तालुक्यासाठी जीवनदायीनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बेशरम वृक्ष वाढले आहेत. मोठी झुडपे, बाभळी नदीपात्रात दिसून येतात. झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा अडकतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. याचा प्रत्यय आखेगाव ते सोमठाणे दरम्यानच्या नदीने बदललेल्या प्रवाहातून शेती वाहून गेल्याने आला आहे.
यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते.
-------
नद्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांमध्ये जाणारे सांडपाणी आणि कचरा तत्काळ थांबविला पाहिजे. सांडपाणी आणि कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आले की नद्या मोकळा श्वास घेऊ शकतील. तसेच नद्यांमध्ये उभारण्यात आलेले काँक्रीटची बांधकामे जमीनदोस्त केली पाहिजे.
-हर्षदा काकडे,
जिल्हा परिषद सदस्या
----
पुरानंतर नद्यांच्या पुनरुत्थानासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. नाल्यांना गटार समजून त्यात सांडपाणी सोडले जाते. तेच नाले नद्यांना जाऊन मिळतात. त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. नदी पात्रातील झुडपे काढून अतिक्रमण हटवायला हवेत.
-बाळासाहेब फटांगडे, सामजिक कार्यकर्ते
---
०६ शेवगाव
नुकत्याच आलेल्या पुरामुळे आखेगाव शिवारातन वाहणाऱ्या नंदिनी नदीने प्रवाह बदलल्याने शेती वाहून गेली.