शिकायचे तर मग काहीही करा अन् पैसे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:37+5:302021-06-20T04:15:37+5:30
विसापूर : १५ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने सर्व शाळांनी ऑनलाईनच प्रवेश सुरू केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरावी ...

शिकायचे तर मग काहीही करा अन् पैसे भरा
विसापूर : १५ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने सर्व शाळांनी ऑनलाईनच प्रवेश सुरू केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फी भरावी यासाठीही तगादाही लावला जात आहे. कोरोनाची स्थिती असली तरीही शाळांकडून फीची मागणी केली जात आहे. शिकायचे तर काहीही करा अन् पैसे भरा असे चित्र शहरासह ग्रामीण भागात सर्रास दिसत आहे.
मागील शैक्षणिक वर्षातही शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. मात्र शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थी व पालकांकडून शैक्षणिक फीची पै ना पै वसूल केली. मागील वर्षात नगर शहरातील एक महिला महाविद्यालय फक्त दीड महिना ऑफलाईन चालले. मात्र या महाविद्यालयाच्या प्रशासनाने पालकांकडून शंभर टक्के शैक्षणिक फी वसूल केली. शिवाय तीन महिन्यांसाठी होस्टेलमध्ये राहण्यासाठीचे ६ हजार रुपयेही वसूल केले. मात्र होस्टेल सुरू झाल्यानंतर दीड महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे होस्टेल बंद झाले होते. या महाविद्यालयाने यंदा तर ११ वी व १२ वी सायन्सच्या ज्या विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये प्रवेश घ्यायचा त्यांना जेईई व सीईटीच्या क्लाससाठी ६ हजार रुपये भरावे लागतील, असा फतवा काढला आहे. त्यामुळे यावर्षी तर मुलींना वार्षिक फी १२ हजार भरावी लागणार आहे.
ग्रामीण भागातील गरीब पालक शहरातील सुरक्षित ठिकाणी शिकण्यासाठी पाठवावे म्हणून या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे कर्जबाजारी होऊन पालक या महाविद्यालयाच्या अटी पूर्ण करतात. त्याचा गैरफायदा घेऊन या शैक्षणिक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने निधी जमा करण्याची शक्कल लढवित आहेत. मागील शैक्षणिक वर्षात संगणकाचा बी.एस्सी. कॉम्प्युटर या अभ्यासक्रमात वर्षभर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे संगणक पाहायला मिळाले नाही. मात्र या महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शैक्षणिक व संगणकाची फी वसूल केली. हा प्रकार ग्रामीण भागातील महाविद्यालयातही सुरू आहे.