अहमदनगर : मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळावी; अन्यथा मुस्लिम समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलनचे जिल्हा समन्वयक सय्यद वाहाब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात साहबान जागीरदार, मुबीन शेख, अन्वर सय्यद, शहानवाज शेख, आबीद शेख, वशीम शेख आदींचा समावेश होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, मुस्लिम समाज सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून, मुस्लिम समजाला १० टक्के आरक्षण मिळावे, मुस्लिम आरक्षण कायदा राज्यात लागू होईपर्यंत आध्यादेश काढून आरक्षण लागू करावे, सन २०२० पासून पुढे होणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत १० टक्के मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव कराव्यात, नोकरीत १० टक्के आरक्षण मिळावे, ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदने देण्यात आली असून, आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. आरक्षण न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.