तिसऱ्या लाटेची घंटा वाजली तर प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:26+5:302021-07-19T04:15:26+5:30
----------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात सहा हजार जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी ...

तिसऱ्या लाटेची घंटा वाजली तर प्रशासन सज्ज
-----------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात सहा हजार जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट भयानक होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात १७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत ३० हजार बेड उपलब्ध होते. तिसऱ्या लाटेसाठी बेडची संख्या दुप्पट करण्यात आली असून, जिल्ह्यात ६० हजार बेड तयार करण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र कोरोना उपचार कक्षही तयार करण्यात आला आहे.
पहिल्यापेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात सव्वादोन लाख लोक बाधित झाले. एकूण सहा हजार जणांच्या मृत्यूपैकी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू हे दुसऱ्या लाटेतील आहेत. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता असल्याने अनेकांना उपचाराविना प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आठवड्यातून दोन ते तीन वेळा तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
-------------
जिल्ह्याच्या काही भागात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्या गावातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कारणांचा शोध घेतला जात आहे. अशा गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात, याबाबत सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
-संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी
--------------
ऑक्सिजन प्रकल्प प्रगतिपथावर
१) संभाव्य तिसऱ्या लाटेतील ऑक्सिजन मागणी लक्षात घेता जिल्ह्यात १२७ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांची संख्या १७ असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात हे प्रकल्प तयार करण्यात येत आहेत.
२) जिल्हा नियोजन निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्जत व पाथर्डी आणि ११ ग्रामीण रुग्णालयात पीएसए प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामधून दररोज १७.९२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून २२ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
३) जिल्हा नियोजन निधीतून ग्रामीण रुग्णालय कर्जत येथे १३ केएल आणि जामखेड ग्रामीण रुग्णालयात १० केएल लिक्विड मेडिकल ऑक्सिजन साठवणूक टँक उभारण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
-------------
१८ वर्षे वयोगटावरील एकूण लोकसंख्या - ०००००००
एकूण लसीकरण - ११,१५,६९७
पहिला डोस - ८,४२,७०१
दुसरा डोस - २,७२,९९६
-----------
जिल्ह्यात ६० हजार बेड
दुसऱ्या लाटेत १४५ कोविड सेंटर, २७५ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व दोन डेडिकेडेट कोविड हॉस्पिटल होती. त्यामध्ये २८ हजारांपेक्षा जास्त बेडची उपलब्धता होती. ही संख्या दुप्पट म्हणजे ५६ ते ६० हजार बेड तयार करण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या खाटा दुसऱ्या लाटेत ५ हजार होत्या, त्या १० हजार करण्यात येणार आहेत, तर व्हेंटिलेटरची संख्या ५४७ होती, त्याची संख्याही दुपटीने वाढविण्यात येणार आहे.
-------
लहान मुलांसाठी केअर सेंटर
दुसऱ्या लाटेत ११ टक्के मुलांना म्हणजे २० हजारांच्यावर मुलांना कोरोना झाल्याचे आरोग्य यंत्रणेने सष्ट केले आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर लहान मुलांसाठीही स्वतंत्र केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. हे सेंटर जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आले आहे.
-------------
पहिली लाट
एकूण रुग्ण - ७५,०००
एकूण मृत्यू - ११४३
-------------
दुसरी लाट
एकूण रुग्ण - २,०६,०००
एकूण मृत्यू - ४७७०