विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते तर महाराष्ट्राला मदत झाली असती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:34+5:302021-04-19T04:18:34+5:30
मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ...

विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते तर महाराष्ट्राला मदत झाली असती
मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. याबाबत महसूलमंत्री थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला. थोरात हे रविवारी (दि. १८) संगमनेरात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी काही चुकीचे केले असले तर त्यांची चौकशी करावी. मला वाटत नाही पोलिसांनी काही चुकीचे केले असेल जे काही केले ते जनतेच्या हिताकरिता केले. मात्र, राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात बसण्याऐवजी दोन दिवस दिल्लीला गेले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला खूप मदत झाली असती.
रेमडेसिविर इंजेक्शनबाबत बोलताना थोरात म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनचा फार दिवस तुटवडा राहील, अशी परिस्थिती आता राहिली नाही. ते आता उपलब्ध होत आहेत. फक्त त्यात कुणी अडचणी आणू नये. एवढीच अपेक्षा आहे. काळजीपूर्वक त्याचा वापर करावा. गरज आहे त्यालाच हे इंजेक्शन दिले पाहिजे. त्यात साठेबाजी नको. असे केले तर इंजेक्शन कमी पडणार नाही. असेही थोरात म्हणाले.
--------------
हे १५ दिवस आपला जीव वाचविणारे
लॉकडाऊनचे फायदे-तोटे आपल्याला माहीत आहेत. कदाचित १५ दिवसांचा काळ आपल्याला कठीण काढावा लागेल, घरातच बसावे लागेल. हे १५ दिवस आपला जीव वाचविणार असतील तर ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. संकटाचा काळ आहे. सरकारने दंडुका घ्यावा अन् मग लॉकडाऊन व्हावे, अशी सरकारची इच्छा नाही. नागरिकांनी साथ द्यावी आणि नियम पाळावे. स्वत:चा जीव वाचवावा, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.