कर्म सेवामय झाले तर जीवन कृतार्थ होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:34+5:302021-06-21T04:15:34+5:30
गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांच्या १७ व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनात देशमुख महाराज मार्गदर्शन ...

कर्म सेवामय झाले तर जीवन कृतार्थ होते
गोदावरी खोरे दूध उत्पादक संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे यांच्या १७ व्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनात देशमुख महाराज मार्गदर्शन करत होते. यावेळी भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, दूध संघाचे संचालक राजेंद्रबापू जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे उपस्थित होते. प्रारंभी परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी स्वागत केले.
सारखा दुःखाचाच विचार करणारा माणूस निराशावादी बनतो. तर, सदैव सुखाचाच विचार करणारा माणूस चंगळवादी होतो. चंगळवादाच्या अतिरेकातून जन्माला येणारे दुःख माणसाला व्यसनांचा गुलाम करते, त्यामुळे आधीच भविष्याचा विचार करून वाटचाल केली, तर वाट्याला येणारे छोटे सुखही जगणे सोपे करून जाते, असे देशमुख महाराज म्हणाले.
आयुष्यात जबाबदारी स्वीकारणारी माणसे एकतर जिंकतात आणि नाही जिंकली तरी त्यातून काहीतरी शिकतात. माणसाचे मन हे चंचल आहे. चंचल मनाला कोणत्याही ध्येयात गुंतवले तर ते मन इंद्रियाच्या आहारी जात नाही. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय बुद्धीला घेऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी नामदेवराव परजणे अण्णा यांच्या आठवणींना उजाळा देताना मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या ध्यासाची आज पूर्तता झाल्याचे स्पष्ट केले.
संवत्सर येथे राजधबाबा प्राणवायू स्मृतिवनात वृक्षारोपण, विचारमंथन या संकलित केलेल्या सुविचार पुस्तिकेचे प्रकाशन तसेच नामदेवराव परजणे महाविद्यालय व कोपरगाव येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती रकमेच्या धनादेशांचे वितरण असे कार्यक्रमही पार पडले.
----
फोटो - देशमुख
ओळी : नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आमदार राधाकृष्ण विखे, राजेश परजणे आदी.