जगतापांचे नाव काँग्रेसला भोकाडी दाखविण्यासाठी : आमदार शिवाजी कर्डीले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 14:48 IST2018-10-17T13:36:04+5:302018-10-17T14:48:45+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात, तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांना पुढे केले आहे. पण कॉँॅग्रेसला भोकाडी दाखवायला त्यांना उमेदवारी जाहीर केली असेल्याचे मला वाटते.

जगतापांचे नाव काँग्रेसला भोकाडी दाखविण्यासाठी : आमदार शिवाजी कर्डीले
श्रीगोंदा : शरद पवार बोलतात एक आणि कृती वेगळीच करतात. तसा त्यांचा इतिहास आहे. अरुणकाका जगताप यांचे नाव त्यांनी लोकसभेसाठी पुढे केले आहे. पण, कॉँॅग्रेसला भोकाडी दाखविण्यासाठी त्यांनी ही खेळी केली आहे. पवारांनी शब्द खरा केला तर जगतापांचे काम करण्याची तयारी आहे, अशा शब्दात भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडविली.
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुकडी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी कर्डिले बोलत होते.
आमदार कर्डिले म्हणाले, मी शेतक-यांचा पुढारी आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना मदत करतो. व्यासपीठावर मी एकटाच भाजपाचा आहे. सरकारने शेतक-यांना सर्वाधिक मदत केली. बोंड अळीच्या शेतक-यांना नुकसानीपोटी ३५ कोटींची मदत केली. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अरुण जगताप यांचेही भाषण झाले. शरद पवारांनी लोकसभेला उमेदवारी करण्याच्या सुचना दिल्याचे ते म्हणाले. यावेळी कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, हरिदास शिर्के उपस्थित होते.
भाजपाची उमेदवारी जगतापांना!
आमदार राहुल जगताप यांचे पितृछत्र हरपले आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना ताकद द्या. मी तर आहेच मागे पण श्रीगोंदेकर लयभारी. काय करतील भरवसा नाही. ऐनवेळी परिस्थिती बदलली तर आमदार राहुल जगताप यांना भाजपाची उमेदवारी घ्यावी लागेल, अशी गुगली कर्डिलेंनी टाकताच एकच हशा पिकला.