शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेला विचारवंतच जबाबदार
By Admin | Updated: March 20, 2016 23:16 IST2016-03-20T23:10:30+5:302016-03-20T23:16:50+5:30
अहमदनगर : आरटीआय कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रातील गुंता वाढला आहे. राज्यभर इंग्रजी शिक्षण संस्था लूट करतात, असे चित्र निर्माण केले जात आहे.

शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेला विचारवंतच जबाबदार
अहमदनगर : आरटीआय कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रातील गुंता वाढला आहे. राज्यभर इंग्रजी शिक्षण संस्था लूट करतात, असे चित्र निर्माण केले जात आहे. वास्तवात ते खरे नाही. इंटरनॅशनल स्कूलच्या नावाखाली शिक्षणाचा धंदा सुरू आहे. शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेला विचारवंत जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असे, आश्वासन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिले.
महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या (मेस्टा) वतीने नगरला जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्ष नेते विखे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे होते. विखे म्हणाले, मी शिक्षणमंत्री असताना मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळांना मान्यता देऊन राज्याचे शैक्षणिक धोरण बदलवले. आज मोठ्या प्रमाणात लोकांची इंग्रजी शाळांना मागणी आहे. मात्र, सत्तेतील भाजपा सरकार हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गळचेपी करीत आहे. सरकारचे जीआर दररोज तयार होतात व ताबडतोब रद्द होतात. विचारहीन सरकारमुळे समस्या निर्माण होत आहेत. संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मेस्टाच्यावतीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याशी बोलून बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन विखे यांनी दिले. ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांची तुलना सरकारने मोठ्या शहरात चालणाऱ्या शाळांशी करू नये. ग्रामीण भागातील शाळा संकटात आहेत़ त्यामुळे या शळांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तायडे यांनी संस्थाचालकांच्या अडचणींचा पाढाच वाचला. मुख्यमंत्र्यांसोबत नागपूर येथे ८ हजार संस्थाचालकांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. त्यावेळी तुमच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देऊन ४ महिने उलटले तरी मुख्यमंत्र्यांचा साधा निरोपही नाही. म्हणूनच आता विरोधी पक्ष नेते विखे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय मेस्टाने घेतल्याचे तायडे यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे मुंबई विभागप्रमुख विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष मनिष हांडे, राज्य संघटक अनिल असलकर, गजानन वाळके, सचिन जाधव, डॉ. माणिक शेळके, डॉ. धनंजय धनवटे, सचिन मलिक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष आनंद कटारिया यांनी केले तर आभार सतीश शिंदे यांनी मानले.