तुमच्या पुढे लोटांगण घालतो पण घरातच थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:23+5:302021-04-22T04:21:23+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच तुकाराम कातोरे हे लोकांना हात जोडून, पाया पडून व ...

तुमच्या पुढे लोटांगण घालतो पण घरातच थांबा
केडगाव : नगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच तुकाराम कातोरे हे लोकांना हात जोडून, पाया पडून व चक्क ग्रामस्थांपुढे लोटांगण घालून घरी थांबण्याची विनंती करत आहेत. ‘बाबांनो, तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे. त्यांच्यासाठी व गावासाठी तरी घरातच थांबा. रस्त्यावर येऊन कोरोनाचा प्रसार करू नका’, अशी आर्त हाक देत आहेत.
सर्वत्र कोरोनाचे थैमान... दवाखान्यात पाय ठेवायला ही जागा नाही... बाधित रुग्णांची प्रचंड संख्या... रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी उडालेली धावपळ... अपुरी पोलीस यंत्रणा हे मन सुन्न करणारे वास्तव चित्र सर्वदूर पाहायला मिळते. पोलीस व वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. शासन व प्रशासनही पोटतिडकीने आवाहन करूनही लोक घरी थांबायला तयार नाहीत. काही काम नसताना लोकं रस्त्यावर येऊन जागोजागी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचे रूग्ण कमालीचे वाढत आहेत.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कातोरे हे दररोज लोकांना मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, किरकोळ दुखणे अंगावर काढू नका. त्यासाठी रॅपिड टेस्ट, एचआर सिटी टेस्ट, सिटी स्कॅन करुन घ्या, असे आवाहन करत आहेत. त्यांच्या या आवाहनाला लोकही आता हळूहळू सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी रंगणारे गप्पांचे फडही ओसरू लागले असून, मोबाईलवर खेळणारी तरुणाई दूर होऊ लागली आहे.
कायद्याचा धाक दाखवून व पोलिसांची भीती बाळगून रस्त्यावर मोकाट फिरणारी माणसं जोपर्यंत स्वतःहून बदलत नाहीत, तोपर्यंत कोरोनाचे युद्ध थांबणार नाही. यासाठी कामरगाव येथील सरपंचांनी राबवलेला उपक्रम प्रेरणादायी व स्तुत्य आहे.
---
प्रशासनाने बाहेरून कितीही दबाव आणला, तरी जोपर्यंत माणूस आतून बदलत नाही, तोपर्यंत कोरोनाला रोखणे अवघड आहे. सर्वांच्या हितासाठी माणसाने स्वतःहून बदलणे आवश्यक आहे.
- तुकाराम कातोरे,
सरपंच, कामरगाव.
---
२१ कामरगाव
कामरगावचे सरपंच गावात सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या नागरिकांपुढे लोटांगण घालताना.