आला रे आला पाऊस आला...
By Admin | Updated: May 27, 2016 00:02 IST2016-05-26T23:55:21+5:302016-05-27T00:02:23+5:30
अहमदनगर : दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला वरुणराजाने अखेर गुरुवारी सायंकाळी दिलासा दिला़ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली़

आला रे आला पाऊस आला...
अहमदनगर : दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला वरुणराजाने अखेर गुरुवारी सायंकाळी दिलासा दिला़ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली़ राहुरी, नेवासा आणि पाथर्डी तालुक्यात दमदार पाऊस झाला असून, बळीराजासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे़ पावसाचे आगमन झाल्याने आला रे आला, पाऊस आला, अशा भावना जिल्हाभरातून व्यक्त होत आहेत़ दरम्यान नगर शहरात रात्री उशिराने सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने नगरकरांची उकाड्यातून सुटका झाली़
रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यात गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली़ रस्त्यातील सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती़ प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली़ त्यानंतर काही वेळातच नेवासा शहरासह परिसरातही हलक्या सरींनी पाऊस सुरू झाला़ पाथर्डी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला़ शहरासह माणिकदौंडी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या़ पिरेवाडी येथे छाया बाबासाहेब पवार यांच्या सहा शेळ्या वीज पडून दगावल्या़ मोहरी गावात झालेल्या वादळामुळे घरावरील पत्रे उडाले़ अर्धा- पाऊणतास पाऊस सुरू होता़ अश्रूबा नजन यांच्या घराची भिंत पडून त्यांची सून व चार वर्षाचा नातू जखमी झाला़
गारांसह पाऊस
राहुरी : गुरूवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यात गारांसह वादळी पाऊस झाला़ पावसामुळे राहुरीचा आठवडे बाजार वाहून गेला. गुरूवारी सायंकाळी आभाळ चांगलेच भरून आले होते. पावसाआधी सोसाट्याचा वारा सुटला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास गारांसह वादळी पावसास सुरूवात झाली. वादळामुळे काही झाडेही कोसळली़ त्यानंतर विद्युत पुरवठा खंडित झाला़ पाण्याच्या टाकीजवळ रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. देसवंडी, आरडगाव, तांदूळवाडी, वळण, मानोरी, धामोरी आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.