पत्नींनी दाखल केलेल्या फिर्यादीत पती झाले आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:15+5:302021-07-17T04:18:15+5:30
नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदीसाठी डॉ. नीलेश शेळके याने शहर बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट ...

पत्नींनी दाखल केलेल्या फिर्यादीत पती झाले आरोपी
नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदीसाठी डॉ. नीलेश शेळके याने शहर बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक केली, अशा प्रकारची फिर्याद राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१८ मध्ये दाखल केली होती. या तिघांची प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानुसार डॉ. शेळके याच्यासह बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व मशिनरी वितरकांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या तीनही फिर्यादी एकाच स्वरूपाच्या आहेत.
दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या अपहारप्रकरणी पुणे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सिनारे, श्रीखंडे व कवडे या तिघा डॉक्टरांना अटक केली होती. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने या डाॅक्टरांना अर्बन बँकेतील २२ कोटी ९० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात तपासासाठी वर्ग करून घेतले. या गुन्ह्यात तिघा डॉक्टरांची पोलीस कोठडी संपल्याने शुक्रवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपासी अधिकारी प्रांजल सोनवणे यांनी न्यायालयात अर्ज करून शहर सहकारी बँकेच्या गुन्ह्यात तपासासाठी या डॉक्टरांना वर्ग करून घेतले.
--------------------
शहर सहकारी बँकेतील अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात तपासादरम्यान तिघा डॉक्टरांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांना गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे.
- प्रांजल सोनवणे, तपासी अधिकारी
-----------------------------
ज्यांनी अपहार चव्हाट्यावर आणला तेच झाले आरोपी
शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी धरून डॉ. नीलेश शेळके याने अपहार केल्याची बाब तिघे डॉक्टर व त्यांच्या पत्नींनी चव्हाट्यावर आणली आहे. आर्थिक गुन्हे शाखा गेल्या अडीच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करीत आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत डॉ. शेळके व योगेश मालपाणी या दोघांनाच अटक केली. शेळके याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्यात नाव असलेेले संचालक व बँकेतील अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. आता मात्र, थेट फिर्यादींनाच अटक झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.