भुकेल्या कुटुंबांना मिळाली धान्याची शिदोरी
By Admin | Updated: May 8, 2016 23:54 IST2016-05-08T23:46:51+5:302016-05-08T23:54:38+5:30
श्रीगोंदा : नाम फाऊंडेशनने श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे ३०० कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे गहू, ज्वारी व तांदूळ हे धान्य देऊन आधार दिला.

भुकेल्या कुटुंबांना मिळाली धान्याची शिदोरी
श्रीगोंदा : नाम फाऊंडेशनने श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे ३०० कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे गहू, ज्वारी व तांदूळ हे धान्य देऊन आधार दिला. घोडेगाव (ता. श्रीगोंदा) येथे रविवारी पिंपरी चिंचवड येथील फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. दुष्काळस्थितीत धान्य मिळून कुटुंबाला आधार मिळाल्याने महिलांचे चेहरे खुलले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच परिगाबाई मचे होत्या.
कोणताही गाजावाजा न करता हे पथक घोडेगाव मंदिरात दाखल झाले. गावकऱ्यांनी पथकाच्या स्वागताचीही तयारी केली होती परंतु पथकातील पदाधिकाऱ्यांनी हार नको फक्त स्नेहाचे श्रीफळ पुरेसे आहे, असे सांगून आमच्या मानापानापेक्षा दुष्काळाने व्याकूळ झालेल्या जीवांना मदतीचा हात देणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. या पथकाने सोबत टेम्पोतून धान्य आणले होते. ते अवघ्या तासाभरात तीनशे कुटुंबांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास रामदास घोडके, धनंजय रोहनगे, आशा गेनी, तुषार शिंदे, अजय लंके, महेश पाटील, भरत काकडे, संदीप मांडे, सुदाम वाघमारे, विजय मचे आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)