‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार? सिग्नलवर दहापैकी सहा विनामास्क, दोघांचा हनुवटीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:46+5:302021-08-12T04:24:46+5:30
----------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोना संपलेला नाही, बाधित रुग्ण सापडताऐत त्यातच तिसरी लाट अन् ‘डेल्टा प्लस’चे सावट ...

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार? सिग्नलवर दहापैकी सहा विनामास्क, दोघांचा हनुवटीला!
-----------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोना संपलेला नाही, बाधित रुग्ण सापडताऐत त्यातच तिसरी लाट अन् ‘डेल्टा प्लस’चे सावट अशी परिस्थिती असतानाही घराबाहेर पडणारे बहुतांशी नागरिक मात्र नियमांचे उल्लंघन करीत बिनधास्त वावरताना दिसत आहेत. मंगळवारी शहरातील डीएसपी चौकातील सिग्नलवर केलेल्या पाहणीत दहापैकी सहा जण विनामास्क दिसले. काहींनी मास्क घातलेले होते; पण ते हनुवटीला.
मंगळवारी नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे ६२८ सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांत रुग्णवाढीचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नियमावली घालून दिली आहे. घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस आणि महापालिकेचे पथक दंडात्मक कारवाई करीत आहे. बहुतांशी नागरिक मात्र नियम तोडण्यातच धन्यता मानत आहेत.
---------------------
बोलताना मास्क ओढतात खाली
संपर्कातून विषाणू पसरतो हे सर्वांना माहीत आहे; पण बहुतांशी जण एकमेकांशी बोलताना मास्क हनुवटीवर घेतात अथवा थेट गळ्यात गुंतवितात. अशा लोकांचा मास्क वापरून काहीच उपयोग होत नाही. यातील एखाद्याला कोरोनाची बाधा असेल तर त्याच्यापासून अनेकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. नगर शहरात बहुतांशी भाजीपाला, फळांचे विक्रेते व इतर दुकानदारही मास्क वापरताना दिसत नाहीत.
-----------------------
लसीकरणाची गती वाढेना (ग्राफिक्स)
वयोगट पहिला डोस दुसरा डोस
१८ ते ४४ २,७२६७८ ३९,७२७
४५ ते ६० ३,०९३१२ १,३१७९२
६० पेक्षा जास्त २,९०८१६ १,४१९७९
----------------------
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे, तसेच इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पोलीस आणि महापालिका पथकाच्या संयुक्त विद्यमाने नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई आणखी कडक करण्याच्या सूचना पोलीस ठाणे निरीक्षकांना दिल्या आहेत.
- विशाल ढुमे, पोलीस उपअधीक्षक नगर शहर
फोटो १० मास्क २
नगर शहरातील डीएसपी चौकात सिग्नलवर विनामास्क जात असलेले नागरिक.
-------------
डमी-१०२९