कसा रचला कट, का केली हत्या; पोलीस तपासात उलगडणार रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:55+5:302021-03-15T04:19:55+5:30
पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बोठे याला अटक केली. रविवारी त्याला पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. ...

कसा रचला कट, का केली हत्या; पोलीस तपासात उलगडणार रहस्य
पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बोठे याला अटक केली. रविवारी त्याला पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. सिद्धार्थ बागले यांनी युक्तिवाद केला. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट का रचला, हा कट कुठे रचला, मारण्याचे नेमके कारण काय, सुपारी देण्यासाठी पैसे कसे उभे केले. तसेच गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींव्यतिरिक्त बोठे याला कुणी मदत केली, हत्याकांड घडल्यानंतर बोठे हा १ डिसेंबरपासून फरार होता. या काळात तो कोठे गेला होता. त्याला कुणी आश्रय दिला होता, त्याला कुणी आर्थिक मदत केली आदी बाबींची विचारपूस करावयाची असून, त्याच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे आहेत. त्यामुळे आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी बागले यांनी केली. न्यायालयाने बोठे याला सात दिवसांची कोठडी दिली आहे. दरम्यान, बोठे याला हैदराबाद येथे मदत करणारे आरोपी जर्नादन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्यासह नगर येथून अटक केलेला महेश वसंत तनपुरे यांना १६ मार्चपर्यंत पोलीसकोठडी दिलेली आहे.
.................
बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट
पोलिसांनी बोठे याला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातील हॉटेलमधून अटक केली तेव्हा त्यांची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशात एक पानाची सुसाईड नोट आढळून आली. ‘माझा कोणत्याही प्रकारे अथवा माझा नैसर्गिक मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबियांना संपर्क करावा’, असा उल्लेख या नोटमध्ये असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.