किती दिवस करायचा अभ्यास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST2021-05-23T04:20:44+5:302021-05-23T04:20:44+5:30
पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने आधीच रद्द केलेल्या आहेत. आता केवळ बारावीच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष ...

किती दिवस करायचा अभ्यास?
पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने आधीच रद्द केलेल्या आहेत. आता केवळ बारावीच्या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीबीएसई बोर्डाने प्रथम दहावीची परीक्षा रद्द केली, त्यानंतर राज्य बोर्डाने दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता जूनमध्ये बारावीची परीक्षा होणार असल्याचे बोलले जात असले तरी सीबीएसई बोर्ड काय निर्णय घेते, यावर राज्य शासनाची भूमिका ठरणार असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे जून महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही तर परीक्षा रद्द करण्याचाही विचार पुढे येत आहे. परंतु बारावी परीक्षेचे गुण, त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे गुण आवश्यक असतात. त्यामुळे मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा होणे गरजेचे आहे, असेही काही पालकांसह तज्ज्ञांचे मत आहे .
एकंदरीत परीक्षेबाबत शासनासह कोणीच काही जाहीर केले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. इतर विद्यार्थ्यांना सुट्या लागलेल्या असताना आपण किती दिवस अभ्यास करायचा? परीक्षा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे अभ्यास करावा की नाही अशा संभ्रमावस्थेत विद्यार्थी असून अनेकांचे पालकही त्यामुळे गोंधळले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होत आहे. शासनाने काय तो निर्णय एकदाचा जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
-----------
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा - ४५०
बारावीसाठी प्रविष्ट विद्यार्थी- ६४,१२७
---------------
एक तर बराचसा अभ्यास ऑनलाईन शिकवला. ग्रामीण भागात नेटवर्क नाही. पालक, शिक्षक सांगतात अभ्यास करा, परीक्षा होणार? आहेत. पण परीक्षा कधी होणार? आता अभ्यास तरी किती दिवस करायचा, असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना पडला आहे.
- दीक्षा पवार, विद्यार्थिनी, भंडारदरा, अकोले
---------
बारावी परीक्षेबाबत अद्याप तरी धोरण निश्चित झालेले नाही. विद्यार्थी सध्या अभ्यास करत असले तरी त्यांची मानसिकता विचारात घेता परीक्षेबाबत निर्णय शासनाने लवकरात लवकर जाहीर करणे गरजेचे आहे.
- प्रा. महेश पाडेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भंडारदरा
--------------
नगर जिल्ह्यातून बारावीसाठी ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीची परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. परंतु शासनाने अद्याप याबाबत काहीही सूचना दिलेल्या नाहीत. शिक्षण विभागाची मात्र सर्व तयारी आहे.
- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक