स्मार्ट एलईडी प्रकल्पानंतरही शहरात अंधार कसा? शिवसेनेचा सवाल, आयुक्तांना दिला कंदिल भेट
By अरुण वाघमोडे | Updated: July 26, 2023 16:32 IST2023-07-26T16:31:48+5:302023-07-26T16:32:19+5:30
Ahmednagar: सावेडी परिसर व प्रोफेसर कॉलनी चौकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने बुधवारी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) मनपा आयुक्तांना कंदील भेट देत बंद पडलेले दिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.

स्मार्ट एलईडी प्रकल्पानंतरही शहरात अंधार कसा? शिवसेनेचा सवाल, आयुक्तांना दिला कंदिल भेट
- अरुण वाघमोडे
अहमदनगर - नगर शहरात महापालिकेने स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविला मात्र, सावेडी परिसर व प्रोफेसर कॉलनी चौकातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने बुधवारी शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) मनपा आयुक्तांना कंदील भेट देत बंद पडलेले दिवे तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.
निवेदन देतेवेळी युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरिष ज़ाधव, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता जाधव, अमोल येवले, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, मुन्ना भिंगारदिवे, संतोष पाटील, अरुण झेंडे, महेश शेळके, उमेश भांबरकर, संतोष डमाळे, पप्पू ठुबे, गुडू भालेराव, विशाल गायकवाड आदींसह सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरातील सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनी चौकापासून पुढे हडकोकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.
सावेडी भागातील हा अतिशय महत्वाचा आणि मोठी वर्दळ असलेला रस्ता आहे. नगर आकाशवाणी, तहसील कार्यालय, मनपा प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्र, तोफखाना पोलीस स्टेशन या रस्त्यावर आहे. प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीच्यावेळी चौपाटी सारखे वातावरण असते. पण येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच छोटे मोठे वाहन अपघात घडतात. रात्रीच्यावेळी रस्यावर सामसूम असताना अनेक वाहन चालक या पथदिव्यांना धडकतात. त्यामुळे हे बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करावेत.