दारूनिर्मिती करणारे शिर्डीचे विश्वस्त कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:09+5:302021-06-25T04:16:09+5:30

साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद सेनेला देण्याचे धोरण ठरल्यानंतर संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियात फिरत आहेत. कोपरगावात ...

How about a Shirdi trustee who makes liquor? | दारूनिर्मिती करणारे शिर्डीचे विश्वस्त कसे?

दारूनिर्मिती करणारे शिर्डीचे विश्वस्त कसे?

साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद सेनेला देण्याचे धोरण ठरल्यानंतर संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियात फिरत आहेत. कोपरगावात तर काही नेत्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला. मात्र, जी नावे समोर आली त्यावर गंभीर आक्षेप जनतेतून नोंदविण्यात आले आहेत. संस्थानच्या शुद्धिकरणाबाबत न्यायालयीन लढाई लढत असलेले संजय काळे यांनी याबाबत पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे. संस्थानच्या विश्वस्त मंडळात कोणत्या व्यक्ती असाव्यात याबाबत न्यायमूर्ती धर्माधिकार यांनी नियमावली घालून दिली आहे. मात्र, शासन ही नियमावली व नैतिकता न पाळता दारू निर्मिती करणारे नेते, यापूर्वी अपात्र ठरलेले, न्यायालयाने जामीन नाकारलेले, संस्थानला मालमत्ता विकणारे, ब्ल्यू फिल्म पाहताना गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींना विश्वस्त करणार असेल तर तो भाविकांचा अवमान आहे. संस्थानच्या विश्वस्तपदासाठी १७ स्वच्छ चेहरे सरकारला राज्यात मिळणार नसतील तर ते दुर्दैव आहे. साईबाबांच्या दरबारात असा कचरा सहन केला जाणार नाही, अन्यथा पुन्हा शुद्धिकरणाची मोहीम घ्यावी लागेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे. काळे यांनी यापूर्वी वेळोवेळी संस्थानमधील गैरप्रकारांना न्यायालयात हरकत घेतलेली आहे.

दरम्यान, विश्वस्त मंडळाच्या संभाव्य यादीत शिर्डीतील एकाही स्थानिक शिवसैनिकाचे नाव दिसत नसल्याने सेनेतही नाराजी आहे. यासंदर्भात शिर्डीत शिवसैनिकांची ज्येष्ठ नेते कमलाकर कोते यांच्या कार्यालयात बैठक झाली. कोेते, सेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

........

संभाजी ब्रिगेडचाही इशारा

शिर्डीच्या विश्वस्त मंडळात राजकीय व्यक्तींचा भरणा करू नका, असे पत्र संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. संभाजी ब्रिगेडने माजी कुलगुरू डाॅ. सर्जेराव निमसे, ॲड. असिम सरोदे, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, बद्रिनाथ महाराज तनपुरे, निवृ्त्ती महाराज आदी नावे विश्वस्त मंडळासाठी सुचविली आहेत. मुख्यमंत्र्यांनी नैतिकता असणाऱ्या व्यक्तींना संस्थानवर बसवावे. संस्थान राजकारण्यांचा व दारूनिर्मिती करणाऱ्यांचा अड्डा बनवू नका, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा भोस यांनीही दिला आहे.

Web Title: How about a Shirdi trustee who makes liquor?