कामगारांना दाखविला घरचा रस्ता
By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-23T23:46:35+5:302014-06-24T00:05:33+5:30
अहमदनगर: कामगारांनी पगारवाढीची मागणी केल्याने निर्माण झालेल्या वादातून अरविंद फुटवेअर कंपनीने सोमवारी सकाळी कामगारांना कामावर हजर करून घेण्यास नकार दिला़

कामगारांना दाखविला घरचा रस्ता
अहमदनगर: कामगारांनी पगारवाढीची मागणी केल्याने निर्माण झालेल्या वादातून अरविंद फुटवेअर कंपनीने सोमवारी सकाळी कामगारांना कामावर हजर करून घेण्यास नकार दिला़ त्यामुळे ४० कामगारांचा प्रश्न निर्माण झाला़
येथील औद्योगिक वसाहतीत अरविंद फुटवेअर कंपनी आहे़ कंपनीत कारखान्यात वापरले जाणारे बुट तयार केले जातात़ कंपनीत जवळपास ६० कामगार काम करत होते़ यापैकी ४० कामगार ठेकेदारामार्फत घेण्यात आले आहेत़ या कामगारांना कोणत्याही सुविधा नाहीत़ आम्ही सर्व कामगार गेल्या तीन-चार वर्षापासून कार्यरत आहोत़ काहींना १८० रुपये हजेरी मिळते तर काही कामगारांना २२० रुपये हजेरी दिली जाते़ त्यामुळे पगारवाढीची मागणी केली़ मात्र व्यवस्थापनाने दखल घेतली नाही म्हणून काही दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन केले़ कामगार न्यायालयातही तक्रार केली़ या न्यायालयाने कामगारांना कामावर हजर करून घेण्याचे आदेश कंपनी व्यवस्थपनास दिले होते़ मात्र कंपनी व्यवस्थापनाने हा आदेश धुडकावून लावत कामगारांना कामावर हजर करून घेण्यास नकार दिला, असे कामगारांचे म्हणणे आहे़
कामगार सकाळी नेहमीप्रमाणे कामावर हजर होण्यासाठी कंपनीच्या प्रवेशव्दारावर जमले़ परंतु त्यांना सुरक्षा रक्षकाने आत जाण्यास नकार दिला़ त्यामुळे प्रवेशव्दारावर एकच गोंधळ उडाला़ स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी दाखल झाले़ त्यांनी व्यवस्थापनाशी याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला़ त्यामुळे हा वाद आणखी चिघळला़
कंपनी व्यवस्थापनाने जुन्या कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला़ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याविषयी वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे़ त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काय तो निर्णय होईल, असे कामगारांना सांगण्यात आले़ मात्र दुपारपर्यंत व्यवस्थापनाकडून निरोप आला नाही, असे संतोष सरोदे, सागर गिर्जे,गणेश गुंड यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निरोप नाही
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मुंबईत आहेत़ त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आहे़ त्यांनी आल्यानंतर काय तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले असून, ते आल्यानंतर याविषयी निर्णय होईल़ स्थानिक पातळीवर निर्णय होऊ शकणार नाही, असे कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़
कामगारांना नियमानुसार पगार मिळत नसून, कामगारांची पिळवणूक केली जात आहे़ त्यामुळेच हा वाद निर्माण झाला असून, कंपनीने थेट कामगारांना बाहेर काढले आहे़ त्यामुळे आता आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे़