नगर तालुक्यात खरीप हंगामाची लगबग
By Admin | Updated: June 10, 2016 23:37 IST2016-06-10T23:27:19+5:302016-06-10T23:37:19+5:30
अहमदनगर : नगर तालुक्याला खरीप हंगामाने सलग तीनदा दगा देऊनही समाधानकारक पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या लागवडीची लगबग सुरु केली आहे.

नगर तालुक्यात खरीप हंगामाची लगबग
अहमदनगर : नगर तालुक्याला खरीप हंगामाने सलग तीनदा दगा देऊनही समाधानकारक पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या लागवडीची लगबग सुरु केली आहे. तालुक्यात यंदा मूग लागवडीत वाढ होणार असली तरी मूग बियाणांचा बाजारात ठणठणाट असल्याने बियाणासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे नियोजन असून, यंदा शेतकऱ्यांच्या बांधावर तूर लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग कृषी विभागाने हाती घेतला आहे. सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, आता समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.
नगर तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो,असे असूनही तालुक्यात जवळपास १९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड केली जाते. मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाने ऐन मोसमात दगा दिल्याने तालुक्यात खरिपाचे उत्पादन होऊ शकले नाही. यावेळी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरु केली आहे. समाधानकारक पाऊस झाला तर तालुक्यात २० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली असून आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत बियाणे खरेदी करत आहेत. कडधान्यांचे वाढलेले भाव लक्षात घेऊन शेतकरी कडधान्य लागवडीकडे वळले आहेत. कृषी विभागाने तालुक्यात यंदा बांधावर तूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले आहे. तुरीचे उत्पादन वाढीसाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे.