चारित्र्याच्या संशयावरून श्रीगोंदा येथील विवाहितेला गरम सळईचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:49 IST2018-03-27T20:25:55+5:302018-03-27T20:49:39+5:30
विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

चारित्र्याच्या संशयावरून श्रीगोंदा येथील विवाहितेला गरम सळईचे चटके
श्रीगोंदा : धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर मुलासोबत का बोलली? या कारणावरून विवाहितेला लोखंडी सळईने पायाला चटके देऊन जखमी केल्याची घटना श्रीगोंदा शहरात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीगोंदा शहरातील बाबुर्डी रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी कोमल पोटे या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, घराच्या बाजूला असलेल्या चारीवर धुणे धुण्यासाठी गेले होते. यावेळी बाजूच्या मुलासोबत का बोलली? असा सवाल करून पती कांतिलाल याने शिवीगाळ केली. पतीसह सासू कमल या दोघांनी मारहाण केली. पतीने लोखंडी सळई गरम करून पाय, मांडीवर चटके दिले. सळई पोळल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घरात कोंडून दरवाजा बाहेरून लावून घेतला. तब्बल दोन तासांनी दरवाजा उघडल्यानंतर जीव वाचवत पळून गेले. बाजूलाच असलेल्या रेल्वे गोदामात एक रात्र व एक दिवस थांबून माहेरी बेलवंडी कोठार येथे आई-वडिलांकडे गेले. त्यानंतर सहा-सात दिवसांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान विवाहितेच्या फिर्यादिवरून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विवाहितेचा पती कांतिलाल पोटे, सासू कमल पोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.