आता रुग्णालयांनीच ऑक्सिजनची व्यवस्था करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:36+5:302021-04-30T04:26:36+5:30
अहमदनगर : रुग्णांच्या नातेवाइकांऐवजी आता रुग्णालयांनीच ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची व्यवस्था करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी ...

आता रुग्णालयांनीच ऑक्सिजनची व्यवस्था करावी
अहमदनगर : रुग्णांच्या नातेवाइकांऐवजी आता रुग्णालयांनीच ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची व्यवस्था करावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी दिला.
अहमदनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले. सदर मृत्यू इतर कारणामुळे झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही, तर रुग्णासाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आणण्यासाठी रुग्णालये रुग्णाच्या नातेवाइकांना सांगतात. रुग्णाचे नातेवाईक खासगी ऑक्सिजन प्लांटवर रांगेत उभे असतात. त्यांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही तर रुग्णही दगावण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी वरील आदेश दिला आहे. या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजनचे सिलिंडर रिफिलर अथवा उत्पादक यांच्याकडून भरून आणण्यासाठी फक्त प्राधिकृत व्यक्तींनाच पाठवावे. रुग्णालयांनी ॲडमिट असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना त्यासाठी पाठवू नये. काही रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाइकांना ऑक्सिजनचे सिलिंडर रिफिलर, उत्पादक यांचेकडून भरून आणणेबाबत सांगण्यात येते. ही बाब अयोग्य असून त्यामुळे रिफीलर/उत्पादकांच्या जागेत अनावश्यक गर्दी होते. रुग्णालयानी त्यांच्या कर्मचाऱ्याला ऑक्सिजन सिलिंडर आणण्याकरिता प्राधिकृत करावे. या प्राधिकृत व्यक्तीस प्राधिकार पत्राशिवाय पाठवू नये, अन्यथा ऑक्सिजन सिलेंडर भरून देऊ नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.