तिसगाव : भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते रात्रीअपरात्री आपतग्रस्तांच्या मदतीला धावले. आमदार मोनिका राजळे यांनी नागरी सुविधांसह कुणीही उपाशी राहू नये, यासाठी वाडीवस्ती-नदीकिनारी पायपीट केली. त्यानंतर ३ दिवसांनी शासकीय दौरे फार्स म्हणून सुरू झाले. त्यांचे कायमच वरातीमागून घोडे येते, अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत केली.
तिसगाव (ता. पाथर्डी) येथे कर्डिले यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले. शुक्रवारी सकाळी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते पूजा करून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी कर्डिले बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, दूध उत्पादकांचे नेते दीपक लांडगे, वैभव खलाटे, पुरुषोत्तम आठरे, बाळासाहेब लवांडे, धीरज मैड, माजी सरपंच संतोष शिंदे, पोपटराव कराळे, उपसरपंच रवींद्र भापसे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे, जिजाबा लोंढे, नारायण कराळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बंडोपंत पाठक, पोपटराव कराळे आदी उपस्थित होते.
सांत्वना, मदतीची आश्वासने, पंचनाम्यांचे फार्स, फोटोसेशन यांचा जनतेला वीट आलाय. शासनस्तरावरील आपतग्रस्तांचे मदतीचे पारंपरिक निकष दूर सारले पाहिजेत. चार दिवसांत सरकारी पातळीवरून मदतीबाबत काय निर्णय होतोय ते पाहू. अन्यथा सामूहिक उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागेल, असा इशारा कर्डिले यांनी दिला. नंदकुमार लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. अक्षय कर्डिले यांनी आभार मानले.