भीज पावसामुळे पेरणीची आशा
By Admin | Updated: July 10, 2014 00:35 IST2014-07-09T23:36:59+5:302014-07-10T00:35:12+5:30
शेवगाव : शेवगावसह परिसरातील काही गावांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही भीज पाऊस झाला. या पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत.

भीज पावसामुळे पेरणीची आशा
शेवगाव : शेवगावसह परिसरातील काही गावांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही भीज पाऊस झाला. या पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात एरंडगाव मंडलात ४७ मि. मी, शेवगाव मंडलात १३ मि. मी, ढोरजळगाव ८ मि. मी तर भातकुडगाव ६ मि. मी पावसाची नोंद झाली. चापडगाव व बोधेगाव ही मंडले निरंक राहिल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
पावसाअभावी तालुक्यात पिण्याचे पाणी व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. विहिरीसह पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांनी तळ गाठला तसेच तालुक्याची जीवनरेखा असलेल्या जायकवाडी जलाशयात जेमतेम ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने काळजी वाढली होती. बियाणे व खतांना मागणी नसल्याने शेतीसह एकूण सर्वच क्षेत्राचे अर्थकारण अडचणीत होते.
नळयोजना पूर्ववत
वीज बिलाच्या १८ लाख रुपये रकमेच्या थकबाकी वसुलीसाठी शहरटाकळी व २८ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा गेली ६ ते ७ महिने बंद होता. जि. प. च्या मदतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरटाकळी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने तीन टँकर कमी करण्यात आले आहेत. आता तालुक्यातील २७ गावे व ९७ वाड्या वस्त्यांना २२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असल्याची माहिती तहसीलदार हरीष सोनार, गटविकास अधिकारी नरेंद्र रेव्हंडकर यांनी दिली.
(तालुका प्रतिनिधी)
बाजरी, तूरला प्राधान्य
शेवगाव तालुक्यात दिर्घ काळ लांबलेल्या पावसाचे काही प्रमाणात आगमन झाल्याने रखडलेल्या खरीप पेरण्यांना सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. बियाणे, खतांच्या खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. तालुक्यात ५० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी, १० हजार हेक्टर क्षेत्रात बाजरीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. पाऊस उशिरा झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी उशिरा का होईना कापूस, बाजरी, तूर आदी पिकांना प्राधान्य देण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे.