पोषक वातावरणाने वाढला मधाचा गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:04+5:302020-12-28T04:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खर्डा : मधमाशांसाठी सर्वांत पोषक हंगाम असलेला हिवाळा सध्या सुरू आहे, तसेच यंदा शेतीशिवार पिकांनी बहरले ...

पोषक वातावरणाने वाढला मधाचा गोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
खर्डा : मधमाशांसाठी सर्वांत पोषक हंगाम असलेला हिवाळा सध्या सुरू आहे, तसेच यंदा शेतीशिवार पिकांनी बहरले असून, मुबलक प्रमाणात पाणीही उपलब्ध असल्याने मधमाशांना मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे मधमाशांच्या संख्येतही वाढ झाली असून, अधिकचा मधही मधविक्री करणाऱ्या तरुणांना मिळत आहे.
गतवर्षी कमी पाऊस आणि दुष्काळामुळे मधाचा गोडवा आटल्याने मधविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला होता. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सध्या विशेष करून ज्वारीचे पीक बहरल्याने यातून मधमाशांना मकरंद सहज उपलब्ध होत आहे. यंदा पोषक वातावरणामुळे मधाचा गोडवा वाढला आहे. एकंदरीतच पोषक वातावरणामुळे मधविक्री करणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर मध उपलब्ध होत असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्नही सुटला आहे.
----
मध तीनशे रुपये किलो..
गावरान मध अधिक चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी असते. मधविक्रेते झाडाच्या फांद्यांना लागलेले मधाचे पोळ न फोडता विक्रीला आणतात. त्यामुळे ग्राहकांनाही शंभर टक्के शुद्ध मध असल्याची खात्री पटते. त्यामुळे अशा गावरान मधाला मोठी मागणी आहे. जामखेड तालुक्यात असा मध तीनशे रुपये किलोपर्यंत विक्री केला जातो. कडुनिंबाच्या मधात औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असल्याने त्याला जास्त दर मिळतो.
----
शेती उत्पादन वाढण्यास मदत..
मधमाशांमुळे परागीभवन होऊन शेती उत्पादन वाढण्यास मदत होते. फुलांमधील पराग, मकरंद व मधमाशांच्या लाळेची प्रक्रिया होऊन मध तयार होतो.
----
मध गोळा करणे जिकिरीचे..
मध विक्रीतून चार पैसे मिळावेत या हेतूने अनेक तरुण मध गोळा करण्याचे काम करतात. मात्र, हे काम अत्यंत जिकिरीचे आहे. मधमाशांच्या मधाचे पोळ बऱ्याचदा काटेरी झाडाझुडपात असतात. काही झाडांवर उंचावरही असतात. अशा अडचणीतून वाट काढत मधमाशांपासून स्वत:चे संरक्षण करीत मध गोळा करावा लागतो.
फोटो ओळी : २७ खर्डा हनी
मध गोळा करून उदरनिर्वाह करणारे खर्डा येथील युवक.