सुदाम देशमुख अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह््यातील गृहनिर्मितीची प्रक्रिया स्थिरावली आहे. मोठ्या किमतीच्या प्रकल्पांना सध्या थंड प्रतिसाद आहे. शासनाचे अनुदान घेऊन परवडणाºया घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. नगर शहरात नव्याने मोठे औद्योगिक प्रकल्प येत नसल्याने आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचा कल पुण्याकडे वाढला आहे. आर्थिक मंदीच्या परिणामाबाबत संमिश्र स्थिती असली तरी एकूणच गेल्या चार ते पाच महिन्यांपासून घरांसाठी ४० टक्के मागणी घटली आहे. शहर आणि जिल्ह््यातील बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधल्यानंतर बांधकाम क्षेत्रातील ही स्थिती समोर आली. अहमदनगर शहर आणि जिल्ह््यातील बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, बांधकामावरील काम करणारे मजूर यांची एक मर्यादित संख्या आहे. काही प्रकल्पांचे काम बंद पडल्याने आणि काही बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प नव्याने सुरू न झाल्याने मजूरांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. मात्र हे प्रमाण २० ते २५ टक्के असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आर्थिक मंदी किंवा तेजी असली तरी नगरचे बांधकाम व्यवसाय विशिष्ट मर्यादेच्या आत किंवा बाहेर नसतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. चार-पाच महिन्यांपासून नव्याने होणारी गृहनिर्मिती सध्या स्थिर आहे. त्यात फारशी वाढ दिसत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांकडून मागणी घटल्याने ४० टक्के फ्लॅट जसेच्या तसेच आहेत. आर्थिक मंदीचा परिणामाबाबत बांधकाम व्यावसायिकांची संमिश्र मते आहेत. कोपरगावमध्येही तयार फ्लॅट शिल्लक राहण्याचे प्रमाण आहेत, असे कोपरगावचे व्यावसायिक प्रसाद नाईक, राजेश ठोळे, श्रीरामपुरचे डॉ. मनोज छाजेड यांनी सांगितले.व्याजाचे दर आणि जीएसटी यामुळे व्यावसायावर निश्चितच परिणाम होतो. अॅटोमोबाईल क्षेत्रासाठी जसे सरकारने पॅकेज दिले आहेत, तसे बांधकाम क्षेत्रासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस नक्कीच येतील. नगर शहराचा विचार केला तर इथे औद्योगिक विकासनाही. तसेच शैक्षणिक संधीही कमी आहेत. जिल्ह्यातील नागरिक नगरमध्ये फ्लॅट घेण्याऐवजी थेट पुण्याकडे जातात, असे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. आर्थिक मंदीचा बांधकाम व्यवसायावर परिणाम झालेला आहे. फ्लॅट विक्री कमी झाल्यामुळे नवे बांधकाम ठप्प झाले आहे. बांधकाम नसल्याने मजुरांची संख्या कमी झाले आहे. मध्यमवर्गीयांना मंदीचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे त्याचा घरे खरेदीकडे असलेला कल कमी झाला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर आहे. सरकार ज्या घरांसाठी अनुदान देत आहे, त्या घरांना चांगली मागणी आहे, असे बांधकाम व्यावसायिक अनिल मुरकुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
नगरमध्ये गृहनिर्मिती स्थिरावली; नगरपेक्षा ग्राहकांची पुण्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:11 IST