हिंगणी बंधा-यात दोघांना जलसमाधी; दोघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 15:26 IST2017-09-16T15:23:47+5:302017-09-16T15:26:00+5:30
कोपरगाव : पोहण्यासाठी हिंगणी बंधा-यावर गेलेल्या शहरातील दोन महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता ...

हिंगणी बंधा-यात दोघांना जलसमाधी; दोघे बचावले
कोपरगाव : पोहण्यासाठी हिंगणी बंधा-यावर गेलेल्या शहरातील दोन महाविद्यालयीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली. यातील अन्य दोघे मित्र बचावले आहेत. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेले सार्थक किशोर सोनवणे (वय १७, रा. निवारा हौसिंग सोसायटी), सार्थक उर्फ साईनाथ संतोष लांडे (वय १७, रा. लक्ष्मीनगर), ऋषीकेश अंकुश आगलावे (रा. लक्ष्मीनगर) व अक्षय नामदेव चौधरी (रा. धारणगाव) हे चौघे मित्र शनिवारी (दि़ १६) सकाळी अकरा वाजता गोदावरी नदीवरील हिंगणी बंधा-यात पोहण्यासाठी गेले होते. हिंगणीच्या वाड्यापासून ते नदीत उतरले. दरम्यान पोहत असताना सार्थक सोनवणे व सार्थक लांडे यांचे गाळामध्ये पाय रूतल्याने त्यांना हालचाल करणे अशक्य झाले. त्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून श्वास गुदमरून मृत्यु झाला. मयत सार्थक उर्फ साईनाथ लांडे हा मूळ माहूली (ता. गंगापूर, जि.औरंगाबाद) येथील असून तो येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत होता.
उर्वरीत दोघा मित्रांनी प्रसंगावधान राखल्याने ते बचावले. याप्रकरणी हिंगणीचे पोलीस पाटील पंडीत पवार यांनी तालुका पोलिसांना खबर दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर, हेड कॉन्स्टेबल एकनाथ बच्छे, अर्जुन बाबर व अमित खोकले यांनी घटनास्थळी जावून राजेंद्र चंदनशिव यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेले. सदर घटनेप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.