सय्यद बाबा उरूसामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याला बळ; डावखर कुटुंबीयांकडे मजारवर चादर चढविण्याचा मान
By शिवाजी पवार | Updated: March 27, 2023 16:34 IST2023-03-27T16:33:57+5:302023-03-27T16:34:30+5:30
हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या ९३ व्या उरूसाला सोमवारपासून सुरुवात झाली.

सय्यद बाबा उरूसामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याला बळ; डावखर कुटुंबीयांकडे मजारवर चादर चढविण्याचा मान
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : येथील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या ९३ व्या उरूसाला सोमवारपासून सुरुवात झाली. शहरातील गोपाळराव डावखर यांनी १९२६ मध्ये सय्यद बाबा यांची कबर बांधल्यामुळे त्यांच्या मजारवर चादर चढविण्याचा मान याच कुटुंबाला मिळालेला आहे. त्यामुळे हा उरूस हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून राज्यभर ओळखला जातो.
शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गानजीक राज्यातील प्रसिद्ध हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांचा दर्गाह आहे. या दर्गाहवर उरूसानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा पवित्र रमजानच्या उपवासामुळे उरूस साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कव्वालीला कार्यक्रम रद्द केल्याची माहिती उरूस समितीने दिली.
शहराच्या जडणघडणीत मोलाची भूमिका असलेल्या गोपाळराव गंगाराम डावखर यांची सय्यद बाबा यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. १९२६ मध्ये सय्यद बाबा यांच्या निधनानंतर डावखर यांनीच सय्यद बाबांची कबर त्यावेळी बांधली. त्यामुळे डावखर कुटुंबीयांकडून मानाची चादर चढविल्यानंतर उरूसाला प्रारंभ होतो. यानंतर तहसील कार्यालय, तालुका पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, उरूस समिती व भाविकांकडून मजारवर चादर चढविली जाते. गोड भाताच्या (न्याज) भंडार्याचे यानिमित्त आयोजन केले जाते.
सय्यद बाबांच्या उरूसानंतर तीन दिवसानंतर शहरातील श्रीराम नवमी यात्रेला सुरवात होते. श्रीराम नवमी यात्रा समितीकडून उरूस समितीच्या सदस्यांचा मंदिरामध्ये सत्कार केला जातो, तर श्रीराम नवमी यात्रा समिती सदस्यांना सय्यद बाबांच्या दर्गाहमध्ये बोलवून गौरविले जाते. दोन्ही यात्रौत्सव पाठोपाठ आनंदाने एकत्रितरित्या साजरे केले जातात. राज्यात हिंदू मुस्लिम सलोख्याचे हे प्रतिक मानले जाते.
उरूस समितीचे अध्यक्ष मुन्ना पठाण, विश्वस्त दिलावर गुलाम रब्बानी, सचिव रज्जाक पठाण, नजीरभाई शेख, कार्याध्यक्ष हाजी मुख्तार शाह, कलीम कुरेशी, स्वागताध्यक्ष रियाज पठाण, उपाध्यक्ष जोऐब जमादार, अशोक उपाध्ये, संजय छल्लारे, लकी सेठी, साजिद मिर्झा, गणेश मगर, रमजानी मामु, जलीलखान पठाण, मुजफ्फर शेख, अंजूम शेख, महंमद रफिक शेख, याकुब बागवान, नजीर मुलानी, अकिल सुन्नाभाई, बंटी जहागिरदार, सलीम पठाण, रमजान शाह, अहमद जहागिरदार यांनी उरूस व रामनवमी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.