आंदोलनांमुळे महामार्ग ठप्प
By Admin | Updated: June 2, 2016 23:10 IST2016-06-02T23:04:11+5:302016-06-02T23:10:12+5:30
करंजी : पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूल येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळून दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनांमुळे महामार्ग ठप्प
करंजी : पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूल येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळून दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे प्रवक्ते दादासाहेब मुंढे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास गोल्हार, शेतकरी पक्षाचे अध्यक्ष अॅड. सतीश पालवे, युवा नेते संजय बडे, सुभाष राक, विशाल घुगे यांनी केले.
सभापती पालवे यांच्या निवासस्थानापासून सकाळी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन पोलिसांचा निषेध केला. मोर्चा पांढरीपूल येथील मुख्य चौकात आल्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक वक्त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भाजपाच्याच दोन लोकप्रतिनिधींनी संबंधीत आरोपींना पाठिशी घातल्याचा आरोप करण्यात यावेळी करण्यात आला.
वंजारी समाजाची मते घेता, मग सभापती पालवे यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय कोणी द्यायचा? जिल्ह्यावर पालकमंत्र्यांचा धाक राहिलेला नाही. पालवे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आंदोलनासारखे उग्र आंदोलन हाती घेऊ. एका लोकसेवकावर हल्ला होऊन महिन्याचा कालावधी उलटूनही आरोपी सापडत नाहीत. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. आरोपींना शोधा अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन आरोपींना आमच्या स्टाईलने पकडून आणू, असा इशारा सोमनाथ खेडकर, संजय बडे, देविदास खेडकर यांनी दिला. आरोपींना अटक न केल्यास पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर व संबंधीत आरोपींच्या घरासमोर एकाचवेळी आंदोलन करण्याचा इशाराही या वक्त्यांनी दिला. आपली भूमिका स्पष्ट करताना सभापती पालवे म्हणाले, मी कोणा समाजाच्या विरोधात नव्हे तर अपप्रवृत्तीच्या विरोधात आहे. सभापती झाल्यापासून अनेकांच्या पोटात दुखत आहे. मी आमदार, खासदार, मंत्र्यांना घाबरत नाही. मी स्वाभिमानी व्यक्ती आहे. आतापर्यंत राजकारणात कधीच लाचारी केली नाही. मात्र, कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
(वार्ताहर)
विटंबनेच्या निषेधार्थ नेवासा फाटा ठप्प
नेवासाफाटा : नेवासाफाटा येथील हॉटेल ‘राजयोग’ ची तोडफोड करुन महापुरुषाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाटा येथील ‘राजमुद्रा’ चौकात मंगळवारी सकाळी १० वाजता शिवप्रेमी संघटना व व्यापाऱ्यांच्यावतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी व्यापारी व नागरिकांना भयमुक्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल पेचे यांनी दिला. खंडणी दिली नाही म्हणून हॉटेलची तोडफोड करण्यात आली. घटना घडूनही पोलीस हतबल कसे? असा सवाल नेवासा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केला. गुन्हेगार व त्यांच्या पाठीराख्यांवर त्वरित कडक कारवाई न केल्यास पोलिसांनाच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाऊसाहेब वाघ, अॅड. कल्याण पिसाळ, अंकुश काळे, युवा सेनेचे मनोज पारखे़, पंचायत समिती सदस्य प्रा. जानकीराम डौले, गणेश निमसे यांचीही भाषणे झाली. रास्ता रोको आंदोलनात बाबा कांगुणे, विजय गाडे, सोपान पंडित, संजय निपुंगे, किशोर जोजार, मुकेश हांडे, अॅड. दीपक एरंडे, शंकर कुऱ्हे तसेच व्यापारी, नागरिक व शिवप्रेमी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी निवेदन स्वीकारले. (वार्ताहर)
परजिल्ह्यातून पालवे समर्थकांची हजेरी
पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी दहा दिवसात आरोपींना अटक करण्याचे लेखी आश्वासन दिले. आरोपींवर ३०७ कलम लावल्याचेही भोईटे यांनी जाहीर केले. आंदोलनाप्रसंगी नगर-औरंगाबाद महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनासाठी पाथर्डी, नगर, शेवगाव, बीड, पुणे, नाशिक, परभणी, औरंगाबाद येथून पालवे समर्थक आले होते.