नाशिकच्या कांद्याला जादा तर अहमदनगरला कमी दर; खा. सदाशिव लोखंडेंचा आरोप
By शिवाजी पवार | Updated: September 13, 2023 16:46 IST2023-09-13T16:46:47+5:302023-09-13T16:46:51+5:30
दोन्ही जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सारखाच भाव मिळण्याची मागणी खासदार लोखंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे

नाशिकच्या कांद्याला जादा तर अहमदनगरला कमी दर; खा. सदाशिव लोखंडेंचा आरोप
श्रीरामपूर (अहमदनगर) : नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शासकीय खरेदी भावामध्ये तफावत होत असल्याची तक्रार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. याप्रश्नी लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबत खासदार लोखंडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर मुख्यमंञी शिंदे, कृषीमंञी धनंजय मुंढे व पणनमंञी अब्दुल सत्तार यांच्याकडे दोन जिल्ह्यातील कांदा खरेदीत एनसीसीएफकडून तफावत सुरू असल्याची माहिती लोखंडे यांनी दिली.
एनसीसीएफच्या अध्यक्षांना याबाबत कळविण्यात आले आहे. दोन्ही जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सारखाच भाव मिळण्याची मागणी खासदार लोखंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्यास २४.०३ पैसे प्रती किलो असा दर असून नगर जिल्ह्यात २०.७५ पैसे प्रती किलो दर दिला जात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे, असे लोखंडे यांनी म्हटले आहे.