नेप्ती उपबाजारमध्ये शेतमालाच्या विक्रीत उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:21+5:302021-02-05T06:34:21+5:30
केडगाव : नेप्ती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल उच्चांकी भावात विकला जावा, यासाठी आडतदाराने अनोखी शक्कल ...

नेप्ती उपबाजारमध्ये शेतमालाच्या विक्रीत उच्चांक
केडगाव : नेप्ती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल उच्चांकी भावात विकला जावा, यासाठी आडतदाराने अनोखी शक्कल लढवित लिलाव पद्धतीने उच्चांकी भावात गवार विकली. परिणामी ८० रुपये किलो गवारीला चक्क १०० रुपयांचा दाम मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी पुरता वैतागून गेल्याची परिस्थिती आहे. तरीही नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतमालाची आवक नेहमीप्रमाणे सुरूच आहे. सोमवारी भाजीपाला मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांची रेलचेल सुरू होती. दुपारच्या सुमारास एका आडतदाराकडे बाजारात शेतकऱ्याची गवार शेंगभाजी विक्रीला आली होती. गवार शेंगभाजी पाहता ग्राहकांची एकच झुंबड उडाली. शेटजी गवार मलाच द्या, असाच कल्लोळ सुरू झाला. त्यावर आडतदाराने शेतकऱ्याचा शेतमाल उच्चांकी भावात विकावा, यासाठी लिलाव पद्धत सुरू केली. पाहता-पाहता ८० रुपये किलो विकली जाणारी गवार चक्क १०० रुपयांपर्यंत विकली गेली. लिलाव पद्धतीमुळे भाजीपाला विक्रीत कमालीची भाववाढ पाहून परिसरातल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कांदा या पिकाप्रमाणेच प्रत्येक भाजीपाल्याची विक्रीही लिलाव पद्धतीने व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.
---
नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज गवार शेंगभाजी विक्रीला आणली होती. आडतदाराने लिलाव पद्धतीने ८० रुपये किलो विकणारी गवार चक्क १०० रुपये किलो रुपयांनी विकून दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला. अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याचा शेतमाल विकला जावा, त्यामुळे आर्थिक स्तर उंचावून शेतकऱ्यांची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यास मदत होईल.
- मच्छींद्र काळोखे,
शेतकरी, हातवळण, ता. आष्टी