करंजीतील ध्येयवेड्या तरुणांनी घेतला समाजसेवेचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST2021-05-23T04:20:57+5:302021-05-23T04:20:57+5:30
करंजी : करंजी (ता.पाथर्डी) येथील दोन ध्येयवेड्या तरुणांनी समाजसेवेचा वसा घेतला आहे. त्यांनी गावातील ५० गरजू कुटुंबांना किराणा मालाचे ...

करंजीतील ध्येयवेड्या तरुणांनी घेतला समाजसेवेचा वसा
करंजी : करंजी (ता.पाथर्डी) येथील दोन ध्येयवेड्या तरुणांनी समाजसेवेचा वसा घेतला आहे. त्यांनी गावातील ५० गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप केले.
ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे व रोहित अकोलकर अशी त्या दोन तरुणांची नावे असून त्यांनी समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत करंजीसह परिसराला कोरोनाने विळखा घातला आहे. अल्पावधीत कोरोनाने ५० जणांचे बळी घेतले. उत्तरेश्वर मंदिरामागे कधी तरी होणारा दहावा नाहीसा होऊन दिवसातून दोन- दोन दहावे होऊ लागले. दहावा कोणाचा याचाही मेळ लागेनासा झाला. अशा भयानक परिस्थितीत करंजीसह सातवड, भोसे, लोहसर, खांडगाव, कौडगाव, देवराई, घाटसिरससह अनेक वर्दळीची गावे ओस पडली.
कोरोनाच्या भीतीने या भागातील लोक दिवस उगताच शेतात जाऊ लागले. मात्र, शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांची उपासमार होऊ लागली. काम नसल्याने दाम नाही, अशा कुटुंबांना खरी मदतीची गरज होती. इच्छा असली तर काहीही साध्य करता येते. या कुटुंबांचे होत असलेले हाल पाहून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या करंजी ग्रामपंचायतचे सदस्य नवनाथ आरोळे व रोहित अकोलकर यांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन येथील ५० कुटुंबांना स्वत:च्या कमाईतून बाजूला ठेवलेल्या रकमेतून महिन्याच्या किराणा मालाचे वाटप केले.
-----
आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य रोजाने कामाला जात आहेत. काही दररोज शेतीत काम करतात. त्यामुळे आम्हाला गरिबीची जाणीव आहे. या गरीब कुटुंबांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली.
-नवनाथ आरोळे, रोहित अकोलकर,
ग्रामपंचायत सदस्य, करंजी
----
२२ करंजी
करंजीच्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन गरजूंना किराणा वाटप करताना तरुण.