आधार लिंक करण्याच्या बहाण्याने शिंगणवाडी येथील तरुणाची ४८ हजाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 17:58 IST2018-02-28T17:54:30+5:302018-02-28T17:58:02+5:30
आधार कार्ड लिंक करायचे आहे, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक आणि इतर तपसिल मिळवून शिंगणवाडी येथील एका तरुणाला ४७ हजार ९०० रुपयांना गंडविल्याची घटना शनिवारी घडली.

आधार लिंक करण्याच्या बहाण्याने शिंगणवाडी येथील तरुणाची ४८ हजाराची फसवणूक
भंडारदरा : आधार कार्ड लिंक करायचे आहे, असे सांगून बँकेचा खाते क्रमांक आणि इतर तपसिल मिळवून शिंगणवाडी येथील एका तरुणाला ४७ हजार ९०० रुपयांना गंडविल्याची घटना शनिवारी घडली. रविवारी पैसे गायब झाल्याचे संबंधित तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शिंगणवाडी येथील अनिल सीदांत सोनवणे या तरुणाला शनिवारी (दि. २४) साडेचार वाजता एक फोन आला व तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लींक करायचे आहे, त्यासाठी तुमचा बॅक खाते क्रमांक द्या, अशी मागणी फोनवरुन बोलणा-या व्यक्तीने केली. सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेतून बोलत आहे, असे सांगून फोन करणा-याने आधार लिंक न केल्यास तुमच्या खात्यावरील सर्व पैसे सरकार जमा होतील, अशी भीती दाखविली. त्यानंतर सोनवणे यांनी संबंधित तरुणाला आपला खाते क्रमांक सांगितला. गाडीचा हप्ता भरण्यासाठी साठवलेली रक्कम जमा होईल, या भीतीने सोनवणे यांनी फोनवरुन बोलणा-या व्यक्तीला बँकेचा खाते क्रमांक सांगितला. त्यानंतर काही वेळातच सोनवणे यांच्या मोबाईलवर एक चार अंकी कोड आला. तो कोडही फोन करणा-या व्यक्तीने सोनवणे याच्याकडून मागवून घेतला. पुन्हा त्या फोन करणा-या व्यक्तीने अनिलचा भाऊ मिलिंद याचाही बँक खाते क्रमांक विचारला. पण तो त्याने सांगितला नाही.
रविवारी अनिल सोनवणे हा खात्यावरील पैसे काढण्यासाठी गेला असता त्याला खात्यावर बॅलन्स नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी अनिल सोनवणे याला आपण फसवले गेलो आहे, याची जाणिव झाली. अनिलने पुन्हा त्या क्रमांकावर फोन केला असता तो क्रमांक चुकीचा आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनिल याने राजूर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.